प्रतापगडाच्या पायथ्याशी कुंभरोशीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जाहीर सभा; जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक प्रचाराचा दणदणीत प्रारंभ
प्रतापगडाच्या पायथ्याशी कुंभरोशीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जाहीर सभा; जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक प्रचाराचा दणदणीत प्रारंभ
कुंभरोशी प्रतिनिधी –
प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या कुंभरोशी गावात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भव्य जाहीर सभा पार पडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीतून शिवसेनेच्या निवडणूक प्रचाराचा अधिकृत शुभारंभ होत असताना संपूर्ण परिसर शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमून गेला.
या वेळी लालबाग–परळचे माजी आमदार दगडू दादा सपकाळ यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख करत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेच्या स्वाभिमान, विकास आणि दिलेल्या शब्दाला जागणाऱ्या परंपरेवर ठाम विश्वास व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आई भवानी, महाबळेश्वरचा महादेव आणि शिवरायांच्या आशीर्वादाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
या सभेत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा परिषदेसाठी तळदेव गटातून अजित सपकाळ, भिलार गटातून प्रदीप चिपटे, कुंभरोशी गणातून संजय मोरे, तळदेव गणातून संजय शेलार, भिलार गणातून पूनम गोळे आणि गुताड गणातून वैशाली जाधव हे उमेदवार निवडणूक रिंगणात असून, सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले.
आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा घेतला. राज्यातील अनेक वर्षे रखडलेले प्रकल्प मार्गी लावून महाराष्ट्राच्या विकासाला गती दिल्याचे त्यांनी सांगितले. मंदिरे, सण-उत्सव पुन्हा सुरू करून लोकजीवन गतिमान केले, तर मुंबई, ठाणे यांसह राज्यभरात रस्ते, पायाभूत सुविधा आणि मोठे विकास प्रकल्प उभे राहिले, असे त्यांनी नमूद केले. शिवसेना हा मालक–नोकरांचा नव्हे तर कार्यकर्त्यांचा पक्ष असून जनता जनार्दनच नेतृत्व ठरवते, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
महिलांच्या मोठ्या उपस्थितीचा उल्लेख करताना “लाडक्या बहिणी”च निवडणुकीचा कौल ठरवतात, असा अनुभव त्यांनी सांगितला. विधानसभेपासून महापालिका व नगरपरिषद निवडणुकांपर्यंत शिवसेना सातत्याने राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरल्याचे सांगत त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका केली. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या शिकवणीनुसार दिलेला शब्द पाळणे हीच शिवसेनेची खरी ओळख असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
प्रतापगड, जावळी खोरे आणि कुंभरोशी परिसराच्या विकासाबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सविस्तर भूमिका मांडली. सेंद्रिय शेती, पर्यटन, ट्रेकिंग, घोडेस्वारी, जलपर्यटन, ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून परिसराचे ब्रँडिंग, पर्यटन सुरक्षा दल, महा पर्यटन महोत्सव, जलपर्यटनासाठी ५३ कोटींची कामे, सात प्रमुख देवस्थानांचा विकास, प्राचीन मंदिरांचे संवर्धन आणि प्रतापगड–तापोळा रस्ता दोन पदरी करण्यासारख्या योजनांची माहिती त्यांनी दिली. स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा, गाव सोडून बाहेर जावे लागू नये, यासाठी एमआयडीसी, उद्योग व कारखाने उभारण्याचा ठाम संकल्प त्यांनी व्यक्त केला.
याच सभेत कुंभरोशी परिसरातील २२ गावांचे पालकत्व आपण स्वीकारत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या सर्व गावांचा विकास हा आपला प्राधान्यक्रम राहील, असा शब्द देत स्वयंरोजगार, पर्यटन आणि स्थानिक उद्योगांना चालना देऊन बाहेरगावी गेलेले युवक पुन्हा आपल्या गावात स्थिरावतील, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
सभेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल सपकाळ, गणेश उतेकर, संभाजी भिलारे, माजी आमदार दगडू दादा सपकाळ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांची ही वीरांची आणि स्वाभिमानाची भूमी असून या भूमीतून लढवली जाणारी निवडणूक शिवसेनाच जिंकेल, असा विश्वास व्यक्त करत “विकासासाठी धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही” असा ठाम संदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सभेत दिला.
Comments
Post a Comment