महाबळेश्वर तालुक्यात निवडणूक रणधुमाळी; जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी अंतिम दिवशी ५० नामनिर्देशन अर्ज दाखल
महाबळेश्वर तालुक्यात निवडणूक रणधुमाळी; जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी अंतिम दिवशी ५० नामनिर्देशन अर्ज दाखल
महाबळेश्वर | प्रतिनिधी
महाबळेश्वर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. मंगळवार, २१ जानेवारी २०२६ रोजी गट व गणांसाठी मोठ्या संख्येने उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केल्याने संपूर्ण तालुक्यात निवडणूक रणधुमाळी पाहायला मिळाली. आजअखेर जिल्हा परिषदेसाठी १६ तर पंचायत समितीसाठी ३४ असे एकूण ५० नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्याची अधिकृत माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.
जिल्हा परिषद ३४ तळदेव गटातून अजित रामचंद्र संकपाळ (शिवसेना), रेणुका अजित संकपाळ (अपक्ष), संजय रामचंद्र गायकवाड (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), सुभाष महादेव सोंडकर (भाजप), कृष्णा भगवान काळे (अपक्ष), धोंडिबा धनावडे (अपक्ष) यांच्यासह एकूण नऊ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. ३५ भिलार जिल्हा परिषद गटातून सुरुवातीला एकही अर्ज दाखल झाला नव्हता, मात्र अंतिम दिवशी प्रदीप विठ्ठल चपटे (अपक्ष व शिवसेना), संजय चंदर केळगणे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), कांचन अभय सावंत (अपक्ष), सुरेश कोंडीराम सपकाळ (भाजप), रंजना संजय कदम (भाजप), सचिन सुरेश सपकाळ (अपक्ष) यांच्यासह एकूण सात उमेदवार रिंगणात उतरले असून येथील लढतही चुरशीची ठरणार आहे.
पंचायत समिती ६७ कुंभरोशी गणातून सचिन श्रीरंग उतेकर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), संजय हरिश्चंद्र मोरे (शिवसेना), सुरेश हरिभाऊ जाधव (भाजप व अपक्ष), समीर मधुकर चव्हाण (अपक्ष), सनी अशोक मोरे (अपक्ष) यांच्यासह एकूण दहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. ६८ तळदेव गणात संजय विठ्ठल शेलार (शिवसेना व अपक्ष), गोविंद देवजी संकपाळ (अपक्ष व भाजप), अभिषेक आत्माराम शिंदे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), संजय महादेव उतेकर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अपक्ष), राजेश भीमराव संकपाळ (अपक्ष), धोंडिबा धनावडे (अपक्ष) यांच्यासह एकूण अकरा उमेदवारांनी आपली ताकद दाखवली आहे.
६९ मेटगुताड गणातून शकुंतला रमेश चोरमले (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), आमीना नदीम शारवान (भाजप), वैशाली संतोष जाधव (शिवसेना व अपक्ष), चंद्राबाई वसंत चोरमले (भाजप) यांच्यासह एकूण पाच उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल केले आहेत. ७० भिलार गणात पूनम निलेश गोळे (अपक्ष व शिवसेना), सविता रामचंद्र गोळे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), वंदना प्रवीण भिलारे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), सुप्रिया अनिल भिलारे (भाजप व अपक्ष), वैशाली बिपीन भिलारे (भाजप), कौशल्या संभाजी भिलारे (अपक्ष) यांच्यासह एकूण आठ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
एकाच गट व गणात काही उमेदवारांनी पक्षीय तसेच अपक्ष स्वरूपात अर्ज दाखल केल्याने पक्षांतर्गत नाराजी, बंडखोरी आणि चिन्ह वाटपाबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. आता नामनिर्देशन अर्जांची छाननी आणि माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार असून, त्यानंतर प्रचाराचा खरा जोर सुरू होणार आहे. महाबळेश्वर तालुक्यातील ही निवडणूक स्थानिक विकास, पर्यटन, रस्ते, पाणी व रोजगार या मुद्द्यांवर अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
Comments
Post a Comment