रोटरी क्लब हडपसर पुणेच्या सहकार्याने जि.प. शाळा कुंभरोशी येथे शैक्षणिक विकासाचा आनंदोत्सव
रोटरी क्लब हडपसर पुणेच्या सहकार्याने जि.प. शाळा कुंभरोशी येथे शैक्षणिक विकासाचा आनंदोत्सव
कुंभरोशी प्रतिनिधी –
कुंभरोशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज आनंदाचा आणि अभिमानाचा सोहळा अनुभवायला मिळाला. शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच भौतिक सुविधांच्या स्वरूपात अनमोल मदत करणाऱ्या रोटरी क्लब हडपसर, पुणे यांच्या सदस्यांनी शाळेस प्रत्यक्ष भेट देत आजवर दिलेल्या विविध उपक्रमांची पाहणी केली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या स्कूलबॅग व शैक्षणिक साहित्य, ई-लर्निंग सॉफ्टवेअर आणि स्मार्ट टीव्ही, मुलींसाठी सॅनिटरी पॅड्स, शिक्षकांसाठी ई-लर्निंग अॅप तसेच शालेय इमारतीसाठी रंगकाम आदी सुविधांची सविस्तर माहिती घेण्यात आली.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, शाळेचे शिस्तबद्ध व उल्लेखनीय कामकाज पाहून समाधान व्यक्त करत शाळेच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असल्याचे चित्र यावेळी स्पष्टपणे दिसून आले. शाळेतील शिक्षक आणि व्यवस्थापनाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे शाळा प्रगतीपथावर असल्याचेही मत उपस्थितांनी व्यक्त केले.
या प्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी आणि रोटरी क्लबचे सदस्य रोटेरियन अजयजी चौरसिया यांनी संगणक शिक्षणाला अधिक बळकटी देण्यासाठी संगणक प्रयोगशाळेसाठी तीन संगणक भेट स्वरूपात उपलब्ध करून दिले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची अधिक प्रभावी संधी मिळणार असून आधुनिक शिक्षणाकडे वाटचाल करण्यास मदत होणार आहे.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत सरपंच कांचनताई सावंत, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मालनजी कदम, सदस्य सनीभाऊ मोरे, अजितजी कारंडे यांची उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते तसेच सर्व सन्माननीय पालक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळेच्या वतीने रोटरी क्लब हडपसर पुणेच्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला.
रोटरी क्लब हडपसर, पुणे यांच्या सातत्यपूर्ण सहकार्यामुळे शाळेच्या शैक्षणिक दर्जात आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात मोलाची भर पडत असल्याबद्दल शाळेच्या वतीने सर्व सन्माननीय सदस्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. शिक्षणाच्या माध्यमातून समाजघडणीचा हा आदर्श उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
Comments
Post a Comment