राष्ट्रवादीची ‘धडाडती तोफ’ मैदानात; तळदेव गटातून संजूबाबा गायकवाड यांचा जिल्हा परिषदेसाठी झंझावात
राष्ट्रवादीची ‘धडाडती तोफ’ मैदानात; तळदेव गटातून संजूबाबा गायकवाड यांचा जिल्हा परिषदेसाठी झंझावात
महाबळेश्वर प्रतिनिधी –
महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव गटातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संजूबाबा गायकवाड यांनी जोरदार तयारीनिशी निवडणूक रिंगणात उडी घेतली असून, त्यांच्या उमेदवारीमुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. तालुक्यात ‘राष्ट्रवादीची धडाडती तोफ’ म्हणून ओळख असलेले संजूबाबा गायकवाड हे बाळासाहेब भिलारे यांचे मानसपुत्र म्हणून परिचित असून, त्यांच्या राजकीय वाटचालीवर बाळासाहेब भिलारे यांच्या नेतृत्वाची आणि शिकवणीची स्पष्ट छाप दिसून येते.
समाजकारणातून राजकारणात प्रवेश केलेले संजूबाबा गायकवाड यांनी पंचायत समितीचे सभापती म्हणून दीर्घकाळ काम करत प्रशासकीय अनुभव आणि निर्णयक्षमता सिद्ध केली आहे. तालुका व जिल्हा पातळीवरील प्रशासनावर मजबूत पकड असणाऱ्या बाळासाहेब भिलारे यांचे ते शिष्य असल्याने प्रशासनाशी समन्वय साधत काम करण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे, असे समर्थकांकडून सांगितले जाते.
गावागावात थेट जनसंपर्क, नागरिकांच्या अडचणी ऐकून घेणे आणि गरज पडल्यास वेळेवर धावून जाण्याची वृत्ती हीच त्यांची खरी ओळख ठरत आहे. शेतकरी, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून, त्यांच्या कामकाजामुळे जनतेचा विश्वास दृढ झाल्याचे चित्र दिसत आहे.
आमदार मकरंद आबा पाटील यांच्या सहकार्याने तळदेव गटात सर्वांगीण विकास साधण्याचा ठाम निर्धार संजूबाबा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य सुविधा आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे या मुद्द्यांवर त्यांचा विशेष भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
खेडोपाडी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा संजूबाबा गायकवाड यांच्या पाठीशी उभा असून, प्रचाराला दिवसेंदिवस अधिक गती मिळत आहे. संघटनशक्ती, अनुभव आणि नेतृत्वाची परंपरा या जोरावर तळदेव गटातील ही लढत अधिकच चुरशीची होत चालली असून, संजूबाबा गायकवाड यांची उमेदवारी निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment