संजय मोरे यांच्या उमेदवारीवर हरकत प्रलंबित; निर्णय रखडल्याने महाबळेश्वर तालुक्यात तणावाचे वातावरण
संजय मोरे यांच्या उमेदवारीवर हरकत प्रलंबित; निर्णय रखडल्याने महाबळेश्वर तालुक्यात तणावाचे वातावरण
महाबळेश्वर प्रतिनिधी –
महाबळेश्वर तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुंभरोशी गणातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. या गणातून पंचायत समिती सदस्य पदासाठी संजय मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांच्या अर्जावर प्रतिस्पर्धी उमेदवार समीर चव्हाण यांनी हरकत घेतली आहे. मात्र या हरकतीवर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अद्याप कोणताही अंतिम निर्णय जाहीर केलेला नसल्याने तालुकाभरात तणाव आणि उत्सुकता दोन्हीही वाढल्या आहेत.
कुंभरोशी गणामध्ये ही लढत अत्यंत अटीतटीची मानली जात असून संजय मोरे आणि समीर चव्हाण हे दोन्ही उमेदवार स्थानिक राजकारणात प्रभावी मानले जातात. त्यामुळे उमेदवारी अर्जावरील हरकतीचा निकाल कोणाच्या बाजूने लागतो, याकडे केवळ कुंभरोशी गणच नव्हे तर संपूर्ण महाबळेश्वर तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. निकालात होणाऱ्या विलंबामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढत असून विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी लवकरच या प्रकरणावर निर्णय देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असली तरी अद्याप ठोस घोषणा न झाल्याने राजकीय वातावरण अधिकच तंग बनले आहे. उमेदवारी अर्जावर नेमका काय निर्णय होतो, यावरच पुढील निवडणूक चित्र स्पष्ट होणार असून तोपर्यंत तालुक्यातील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
Comments
Post a Comment