महाबळेश्वर तालुक्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचा प्रचार वेगात; राजेंद्र राजपुरेंच्या नेतृत्वाखाली गायकवाड–उतेकरांची गावागावात ताकदवान मोर्चेबांधणी
महाबळेश्वर तालुक्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचा प्रचार वेगात; राजेंद्र राजपुरेंच्या नेतृत्वाखाली गायकवाड–उतेकरांची गावागावात ताकदवान मोर्चेबांधणी
कुंभरोशी प्रतिनिधी –
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसाधारण प्रक्रिया पूर्ण होताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने महाबळेश्वर तालुक्यात प्रचाराचा आक्रमक झंझावात सुरू केला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते धोंडीराम जंगम, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तळदेव गटातील जिल्हा परिषद उमेदवार संजय गायकवाड आणि पंचायत समिती कुंभरोशी गणाचे उमेदवार सचिन उतेकर यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. कुंभरोशी, जावली, हरोशी, दरे आणि प्रतापगड या गावांमध्ये प्रत्यक्ष भेटी घेत ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांनी प्रचाराचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला.
या प्रचार दौऱ्यात उमेदवारांनी घराघरांत जाऊन जनतेशी थेट संपर्क साधला. गावागावातील पाणीपुरवठ्याच्या समस्या, रस्त्यांची दुरवस्था, आरोग्य सुविधांचा अभाव, शेतकऱ्यांच्या अडचणी, युवकांसाठी रोजगाराच्या संधी आणि सर्वांगीण ग्रामविकासाचे प्रश्न ग्रामस्थांनी मोकळेपणाने मांडले. या प्रश्नांना उत्तर देताना संजय गायकवाड आणि सचिन उतेकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून निधी व योजना प्रभावीपणे राबवून विकासाला गती देण्याची ठाम भूमिका मांडली. जनतेच्या विश्वासावर खरे उतरून विकासकामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
प्रचारादरम्यान राजेंद्र शेठ राजपुरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना संघटन मजबूत ठेवण्यावर भर दिला. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून, विकासाभिमुख व पारदर्शक कारभार हेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे धोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जनतेशी थेट संवाद, अनुभवी नेतृत्व आणि विकासाची स्पष्ट दिशा यामुळे या निवडणुकीत यश निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रचार दौऱ्याला सर्व गावांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. आगामी काळात संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत प्रचार अधिक तीव्र करण्याचा निर्धार उमेदवार आणि पक्ष कार्यकर्त्यांनी केला असून महाबळेश्वर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
Comments
Post a Comment