कराड येथील महाविहारात बौद्धाचार्य परीक्षा संपन्न; कुमठेचे सुपुत्र आयु. संतोष जाधव यांचे उत्तम यश
कराड येथील महाविहारात बौद्धाचार्य परीक्षा संपन्न; कुमठेचे सुपुत्र आयु. संतोष जाधव यांचे उत्तम यश
पार प्रतिनिधी :
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तसेच भारतीय बौद्ध महासभा, शाखा सातारा जिल्हा पश्चिम यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०९ नोव्हेंबर २०२५ रोजी कराड येथील महाविहार येथे बौद्धाचार्य परीक्षा उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या परीक्षेमध्ये कुमठे गावचे सुपुत्र आयु. संतोष रामचंद्र जाधव यांनी उत्तम गुणांसह बौद्धाचार्य परीक्षेत यश संपादन केल्याने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या बौद्धाचार्य परीक्षेच्या माध्यमातून बौद्ध धम्माचे तत्त्वज्ञान, भगवान गौतम बुद्धांचे विचार, सामाजिक समता, बंधुता व करुणेचे मूल्य यांचा सखोल अभ्यास केला जातो. अशा महत्त्वपूर्ण परीक्षेत आयु. संतोष जाधव यांनी घवघवीत यश मिळवून केवळ कुमठे गावाचाच नव्हे, तर संपूर्ण परिसराचा नावलौकिक वाढविला आहे. त्यांच्या या यशामुळे युवकांमध्ये बौद्ध धम्माचे विचार आत्मसात करण्याची प्रेरणा मिळेल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
या यशाबद्दल समस्त बौद्ध विकास सेवा संघ कुमठे, रमाई माता महिला मंडळ कुमठे तसेच भीमज्योत नवतरुण मंडळ कुमठे यांच्या वतीने आयु. संतोष रामचंद्र जाधव यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. त्यांच्या यशामुळे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात बौद्ध विचारांची जाणीव अधिक व्यापक होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
जय भीम, नमो बुद्धायच्या घोषात या यशाचे स्वागत होत असून, आयु. संतोष जाधव यांच्या पुढील कार्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment