महाबळेश्वरमध्ये महायुतीतील घटक पक्षांतच थेट लढत; सर्व उमेदवारी अर्ज वैध, संजय मोरे यांचा अर्जही आक्षेपानंतर मंजूर

महाबळेश्वरमध्ये महायुतीतील घटक पक्षांतच थेट लढत; सर्व उमेदवारी अर्ज वैध, संजय मोरे यांचा अर्जही आक्षेपानंतर मंजूर

महाबळेश्वर प्रतिनिधी , दि. २३ —

 जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर तालुक्यात यंदा महायुतीतीलच तीन प्रमुख घटक पक्षांमध्ये मुख्य सामना रंगणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. प्रत्येक गट व गणात मातब्बर आणि प्रभावशाली उमेदवार मैदानात उतरल्याने निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असून, सर्वच पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होण्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.

महाबळेश्वर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या दोन गटांसाठी आणि पंचायत समितीच्या चार गणांसाठी एकूण ४१ उमेदवारांनी ५० उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या सर्व उमेदवारी अर्जांची छाननी आज तहसीलदार कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सकाळपासून सुरू झालेल्या या छाननी प्रक्रियेत सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले.

छाननीदरम्यान काही उमेदवारांनी अधिकृत पक्षाच्या वतीने तसेच अपक्ष म्हणून असे दोन-दोन उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे निदर्शनास आले. मात्र, ज्या उमेदवारांनी पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि त्या अर्जासोबत संबंधित पक्षाचा अधिकृत ‘एबी फॉर्म’ जोडलेला नव्हता, अशा उमेदवारांचे अर्ज अपक्ष म्हणून ग्राह्य धरण्यात आले. यामध्ये वैशाली बिपीन भिलारे, सविता रामचंद्र गोळे, चंद्राबाई वसंत चोरमले, राजेश भिमराव संकपाळ आणि सुरेश कोंडीराम सपकाळ या उमेदवारांचा समावेश आहे.

दरम्यान, कुंभरोशी गणातील शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांच्या उमेदवारी अर्जावर त्यांच्या विरोधी उमेदवाराकडून तीन आक्षेप दाखल करण्यात आले होते. या आक्षेपांवर तहसील कार्यालयात तब्बल तीन तास रितसर सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान प्रत्येक आक्षेपावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मात्र, संजय मोरे यांच्याविरोधात घेण्यात आलेला एकही आरोप हरकतदार उमेदवारास ठोस पुराव्यानिशी सिद्ध करता आला नाही.

सर्व बाजूंचा सखोल विचार करून निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली राजमाने यांनी संजय मोरे यांच्या उमेदवारी अर्जावर आलेले सर्व आक्षेप फेटाळून लावले. अखेर संजय मोरे यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आल्याचा अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे कुंभरोशी गणातील निवडणूक लढतीत रंगत वाढली असून, महाबळेश्वर तालुक्यातील एकूणच निवडणूक वातावरण अधिक तापले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl