लो-वॅल्यू प्लास्टिकला नवे आयुष्य : पाचगणीतील सिडनी पॉईंटवर पर्यावरणपूरक सुविधांचे लोकार्पण

लो-वॅल्यू प्लास्टिकला नवे आयुष्य : पाचगणीतील सिडनी पॉईंटवर पर्यावरणपूरक सुविधांचे लोकार्पण

पाचगणी प्रतिनिधी –

पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद आणि नेस्ले प्रणित हिलदारी अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने पाचगणीतील प्रसिद्ध सिडनी पॉईंट येथे लो-वॅल्यू प्लास्टिकच्या पुनर्वापरातून साकारण्यात आलेल्या पर्यावरणपूरक सार्वजनिक सुविधांचे लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले. कचऱ्यात जाणाऱ्या आणि पर्यावरणासाठी घातक ठरणाऱ्या प्लास्टिकला उपयुक्त स्वरूप देत या ठिकाणी रिसायकल प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेल्या बेंच, पेविंग ब्लॉक आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक फेन्सिंग बसवण्यात आली आहे.

या अभिनव उपक्रमांतर्गत एकूण दोन बेंच, शंभरहून अधिक पेविंग ब्लॉक तसेच फेन्सिंग उभारण्यात आली असून, यासाठी तब्बल १५० किलोपेक्षा अधिक लो-वॅल्यू प्लास्टिकचा पुनर्वापर करण्यात आला आहे. पर्यावरणाला हानी पोहोचवणारे प्लास्टिक कचऱ्यात न टाकता त्याचा सार्वजनिक सुविधांसाठी वापर केल्याने हा उपक्रम पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरतो. या नव्या सुविधांमुळे सिडनी पॉईंटवर येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांना बसण्यासाठी सुविधा उपलब्ध झाली असून, आकर्षक अशी गॅलरी व सेल्फी पॉईंट तयार झाल्याने पर्यटनस्थळाच्या सौंदर्यात भर पडली आहे. परिणामी पर्यटकांचा अनुभव अधिक आनंददायी व संस्मरणीय होणार आहे.

या सुविधांचे लोकार्पण पाचगणीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री. दिलीप बगाडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक शेखर कासुर्डे, नारायण बिरामणे, सुप्रिया माने, आकाश बगाडे, राजश्री सणस, परवीन मेमन, माधुरी कासुर्डे, अमित कांबळे, स्वाती कांबळे आणि शिल्पा माने उपस्थित होते. तसेच पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. पंडित पाटील, आरोग्य विभाग प्रमुख स्वाती पाटील, शहर समन्वयक ओंकार ढोले, सुनील सनबे, स्वच्छता मुकादम विकी चव्हाण यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी हिलदारी अभियानाचे डॉ. मुकेश कुळकर्णी यांनी रिसायकल प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेल्या बेंच, पेविंग ब्लॉक आणि फेन्सिंगची संकल्पना, त्यामागील प्रक्रिया तसेच या उपक्रमाचे पर्यावरणीय महत्त्व उपस्थितांना थोडक्यात समजावून सांगितले. लो-वॅल्यू प्लास्टिकचे योग्य व्यवस्थापन केल्यास ते पर्यावरणासाठी उपयुक्त ठरू शकते, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हिलदारीचे दीपक मदने, गणेश शेडगे, दिपाली धनवडे, प्राजक्ता बोडरे, अस्मिता कासुर्डे आणि निखील खरात यांनी विशेष परिश्रम घेतले. ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता, शाश्वत पर्यटन आणि पर्यावरणपूरक विकास यांचा उत्कृष्ट संगम साधणारा हा उपक्रम असून, भविष्यातही अशाच नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणस्नेही उपक्रमांच्या माध्यमातून पाचगणी शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि हरित बनवण्याचा संकल्प नगरपरिषद आणि हिलदारी अभियानाने व्यक्त केला आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl