महाबळेश्वरची ग्रामदेवता श्री जन्नीमाता आई म्हमादेवी यात्रेला भक्तिभावात सुरुवात
महाबळेश्वरची ग्रामदेवता श्री जन्नीमाता आई म्हमादेवी यात्रेला भक्तिभावात सुरुवात
महाबळेश्वर प्रतिनिधी , ता. १८ —
महाबळेश्वर शहराची ग्रामदैवत श्री जन्नीमाता आई म्हमादेवी यांच्या तीन दिवसांच्या वार्षिक यात्रेला आज मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात प्रारंभ झाला. महाबळेश्वरचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या शुभहस्ते म्हमादेवीच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून श्रीफळ वाढवण्यात आले. यानंतर आई म्हमादेवीच्या मुखवट्याची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या पालखीचे भोई म्हणून नगराध्यक्ष सुनील शिंदे स्वतः सहभागी झाले होते, यामुळे यात्रेचे महत्त्व अधिकच अधोरेखित झाले.
या प्रसंगी श्री जन्नीमाता आई म्हमादेवी विकास सेवा मंडळ महाबळेश्वरचे पदाधिकारी तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्योजक रमेश पलोड, अतुल सलागरे, सुनील पाटील, प्रमोद शेटे, रमेश शिंदे, किसन खामकर, पुजारी अनिल लोहार, शिरीष गांधी यांच्यासह अनेक भाविकांनी देवीचे दर्शन घेऊन पूजनात सहभाग नोंदवला. संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.
महाबळेश्वर शहराच्या वतीने दरवर्षी श्री जन्नीमाता म्हमादेवी विकास सेवा मंडळ व महाबळेश्वरमधील नागरिकांच्या सहकार्याने या यात्रेचे आयोजन केले जाते. या तीन दिवसांच्या यात्रेदरम्यान आई म्हमादेवीची नगरप्रदक्षिणा, जन्नीमाता देवीचा महाभिषेक, होम-हवन, सत्यनारायण पूजा, महाप्रसाद, देवीचा जागर, गोंधळ, विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच भव्य महाआरती अशा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या निमित्ताने महाबळेश्वर शहरात भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचे सुंदर दर्शन घडत असून भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
Comments
Post a Comment