थंडीवर मात करत आरोग्याचीही जपणूक; गिरिस्थानच्या विद्यार्थिनींसाठी इनर व्हील व रोटरी
थंडीवर मात करत आरोग्याचीही जपणूक; गिरिस्थानच्या विद्यार्थिनींसाठी इनर व्हील व रोटरी क्लबचा मायेचा हात
महाबळेश्वर प्रतिनिधी –
महाबळेश्वर इनर व्हील व रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने गिरिस्थान भागातील विद्यार्थिनींसाठी सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविण्यात आला. थंडीच्या दिवसांत विद्यार्थिनींना उब मिळावी, तसेच त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जावी या उद्देशाने महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या मुलींची शाळा क्रमांक ०२ येथे स्वेटर वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शाळेच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात शंभरहून अधिक विद्यार्थिनींना स्वेटर्सचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमामध्ये केवळ थंडीपासून संरक्षण एवढाच उद्देश न ठेवता विद्यार्थिनींच्या आरोग्याकडेही लक्ष देण्यात आले. हिमोग्लोबिन पातळी वाढीसाठी विद्यार्थिनींना शेंगदाणे व गुळ यांचे वाटप करण्यात आले. यासोबतच इनर व्हील क्लबच्या सदस्या अश्विनी कोमटी यांच्या वतीने विद्यार्थिनींना शालेय साहित्याची मदत देण्यात आली तसेच खाऊचेही वितरण करण्यात आले. या सर्व मदतीमुळे विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसून आला.
या कार्यक्रमास इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा वर्षा पार्टे, उपाध्यक्षा मुक्ता कोमटी, सविता पल्लोड, वंदना पल्लोड, अदिती भांगडिया, नेहा साळवी, मनीषा कोमटी, अश्विनी कोमटी यांच्यासह रोटरी क्लब ऑफ महाबळेश्वरचे अध्यक्ष विजय काळे, महेश कोमटी, शिरीष गांधी, दिलीप रिंगे, स्वाती भांगडिया, धीरेन नागपाल, राजन ढेबे, दिनेश भिसे आदी सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष शिंदे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या वतीने इनर व्हील व रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांचे विद्यार्थिनींसाठी केलेल्या या मोलाच्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानण्यात आले. या उपक्रमामुळे शिक्षणासोबतच आरोग्य, संवेदनशीलता व सामाजिक जबाबदारीचा संदेश प्रभावीपणे पोहोचला असून पालक व स्थानिक नागरिकांकडूनही या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले.
Comments
Post a Comment