आंबेनळी घाटात एमएसआयडीसीकडून पर्यटकांच्या जीवाशी खेळ; तुटलेल्या संरक्षक कटड्याजवळ पत्र्याचा धोकादायक आडोसा कोसळला
आंबेनळी घाटात एमएसआयडीसीकडून पर्यटकांच्या जीवाशी खेळ; तुटलेल्या संरक्षक कटड्याजवळ पत्र्याचा धोकादायक आडोसा कोसळला
महाबळेश्वर प्रतिनिधी –
आंबेनळी घाट परिसरात एमएसआयडीसीकडून पर्यटकांच्या सुरक्षिततेकडे होत असलेले दुर्लक्ष पुन्हा एकदा समोर आले असून, तुटलेल्या संरक्षक कटड्यांच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेला पत्र्याचा आडोसा आता तुटून पडला आहे. या ठिकाणी कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना न करता केवळ पत्र्याचा आडोसा करून पर्यटकांच्या जीवाशी थेट खेळ सुरू असल्याचे स्पष्टपणे निदर्शनास येत आहे.
ज्या ठिकाणी हा पत्र्याचा आडोसा तुटलेला आहे, तेथून खाली जवळपास २०० फूट खोल दरी असून रस्ता अत्यंत अरुंद आहे. अशा धोकादायक ठिकाणी वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. घाटात येणारे पर्यटक, स्थानिक नागरिक तसेच चालक यांना या ठिकाणी मोठा अपघात होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा धुक्याच्या परिस्थितीत ही जागा अधिकच जीवघेणी ठरत आहे.
या संदर्भात ‘माझं गाव माझी बातमी’च्या माध्यमातून अनेक वेळा आवाज उठवण्यात आला असून संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्नही झाला आहे. मात्र, एमएसआयडीसीकडून आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. तुटलेल्या संरक्षक कटड्यांची दुरुस्ती, मजबूत सुरक्षा भिंत उभारणे किंवा योग्य दिशादर्शक व इशारा फलक लावणे यासारख्या प्राथमिक उपाययोजनांकडेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
आंबेनळी घाट हा कोकण व महाबळेश्वरला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून हजारो पर्यटक दरवर्षी या मार्गावरून प्रवास करतात. अशा ठिकाणी तात्पुरत्या आणि निकृष्ट उपाययोजना करून केवळ औपचारिकता पूर्ण केली जात असल्याने एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उपस्थित होत आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी एमएसआयडीसीने तातडीने दखल घेऊन कायमस्वरूपी व सुरक्षित उपाययोजना राबवाव्यात, अशी जोरदार मागणी नागरिक व प्रवाशांकडून होत आहे.
Comments
Post a Comment