महाबळेश्वर तालुक्यात तळदेव गटात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तिरंगी लढत निश्चित
महाबळेश्वर तालुक्यात तळदेव गटात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तिरंगी लढत निश्चित
महाबळेश्वर प्रतिनिधी –
महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर तळदेव गटातील राजकीय चित्र स्पष्ट झाले असून येथे तिरंगी लढत निश्चित झाली आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी माघार घेतल्याने आता अंतिम उमेदवार निश्चित झाले असून निवडणूक प्रचाराला वेग आला आहे.
तळदेव गट जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरुवातीला एकूण सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र अर्ज माघारीच्या प्रक्रियेत रेणुका अजित संकपाळ, कृष्णा भगवान काळे, धोंडीबा रामचंद्र धनवडे आणि अभिषेक आत्माराम शिंदे यांनी आपले नामनिर्देशन अर्ज माघारी घेतले. त्यामुळे तळदेव गटातून शिवसेनेचे अजित रामचंद्र संपत, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय रामचंद्र गायकवाड आणि भाजपचे सुभाष महादेव सोंडकर हे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिले आहेत.
तिन्ही प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार मैदानात असल्याने तळदेव गटातील निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. स्थानिक विकासकामे, मूलभूत सुविधा, गावातील प्रश्न आणि पक्षांची संघटनात्मक ताकद या मुद्द्यांवर प्रचार रंगणार असून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. तळदेव गटात मतदार कोणाच्या पारड्यात कौल देतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून जिल्हा परिषद निवडणुकीतील ही तिरंगी लढत चांगलीच लक्षवेधी ठरण्याची चिन्हे आहेत.
Comments
Post a Comment