थंड हवेच्या महाबळेश्वरमध्ये निवडणूक रणधुमाळी; जिल्हा परिषद–पंचायत समितीच्या लढतीने राजकारण तापले



थंड हवेच्या महाबळेश्वरमध्ये निवडणूक रणधुमाळी; जिल्हा परिषद–पंचायत समितीच्या लढतीने राजकारण तापले

जितेंद्र करंडे, 
महाबळेश्वर प्रतिनिधी –

थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. ग्रामीण जनतेच्या दैनंदिन जीवनाशी थेट निगडित असलेल्या या निवडणुका असल्याने आणि उमेदवार बहुतांशी स्थानिक, परिचित व एकमेकांशी जवळचे असल्याने यंदाच्या निवडणुकांमध्ये मोठी चळवळ होणार, हे आता स्पष्ट होत आहे. प्रत्येक गटात इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवारीवरून अंतर्गत अस्वस्थता, नाराजी आणि राजकीय समीकरणांची नव्याने जुळवाजुळव सुरू झाली आहे.

तळदेव गटामध्ये जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेकडून अजित सपकाळ यांचे नाव आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा सुरू असून, त्यामुळे बजरंग सपकाळ व इतर इच्छुक उमेदवार नाराज होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी सभापती संजूबाबा गायकवाड यांचे नाव पुढे येत असून, यामुळे पक्षातील सुभाष सोंडकर यांच्या नाराजीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या अंतर्गत घडामोडींचा थेट परिणाम निवडणुकीच्या समीकरणांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कुंभरोशी गणामध्येही राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेकडून समीर चव्हाण यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे येत असल्याने संजय मोरे यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सचिन उतेकर यांचे नाव चर्चेत असून, त्यामुळे सुरेश जाधव यांची भूमिका काय राहणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कुंभरोशी गणातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस अधिकच तापत चालले आहे.

तळदेव गणातून पंचायत समितीसाठी शिवसेनेकडून संजय शेलार यांचे नाव पुढे येत असल्याचे संकेत मिळत असून, यामुळे गणेश उतेकर यांच्या नाराजीची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सागर कदम आणि भाऊसाहेब मोरे या दोन नावांमध्ये जोरदार चुरस निर्माण झाली असून उमेदवारी कोणाला मिळणार, याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. या निवडणूक काळात विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सुरू असलेल्या नाराजीच्या चर्चांमुळे मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता नागरिकांमध्ये बोलली जात असून, त्याचा थेट फायदा भाजपला होऊ शकतो, अशी चर्चा गावागावांत ऐकू येत आहे.

तळदेव गट हा महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम भागात विस्तारलेला असून कोयना, सोळशी आणि कांदाटी या तीन नदीपात्रांच्या तीरावर वसलेल्या अनेक गावांचा या गटात समावेश आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी भौगोलिक अडचणींवर मात करत सर्व गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर धावपळ करावी लागणार आहे. बैठका, चर्चा, गाठीभेटी आणि मतदारांशी थेट संवाद यांना वेग आला असून प्रत्येक पक्ष आपली संघटनात्मक ताकद पणाला लावताना दिसत आहे.

दरम्यान, आज अर्ज भरण्याचा पहिला दिवस असल्याने तहसीलदार कार्यालय परिसरात सकाळपासूनच गजबजलेले चित्र पाहायला मिळाले. अर्ज भरण्यासाठी तसेच निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती मिळवण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. पुढील एक-दोन दिवसांत सर्व प्रमुख पक्षांकडून उमेदवारांच्या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असून भाजपकडून कोणते चेहरे पुढे येणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. थंड हवामानाच्या महाबळेश्वरमध्ये सुरू झालेली ही निवडणूक रणधुमाळी पुढील काही आठवडे तालुक्याच्या राजकारणाला अधिकच उष्ण बनवणार, हे मात्र निश्चित आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl