तळदेव गटात बहुरंगी राजकीय लढत; शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप आमनेसामने
तळदेव गटात बहुरंगी राजकीय लढत; शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप आमनेसामने
महाबळेश्वर प्रतिनिधी –
महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव गट क्रमांक ३४ मध्ये यंदाच्या पंचायत समिती निवडणुकीत राजकीय समीकरणे अधिकच रंगतदार होताना दिसत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी या प्रमुख पक्षांसह अनेक अपक्ष उमेदवार रिंगणात उतरल्याने तळदेव गटातील लढत बहुकोनी आणि लक्षवेधी ठरली आहे. विविध पक्षांच्या नेत्यांनी वेगवेगळ्या रणनीती आखत आपले उमेदवार मैदानात उतरवले असून मतदारांमध्येही उत्सुकता वाढली आहे.
या गटात अजित रामचंद्र संकपाळ यांनी शिवसेना तसेच अपक्ष अशा दोन स्वरूपात अर्ज दाखल केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तापोळा येथील संकपाळ हे स्थानिक पातळीवर परिचित चेहरा असून त्यांच्या उमेदवारीकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे. त्याचप्रमाणे पारसोंड येथील सुभाष महादेव सोंडकर यांनी भाजप तसेच अपक्ष म्हणून अर्ज भरल्याने भाजपच्या अंतर्गत समीकरणांवरही चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आचली येथील संजय रामचंद्र गायकवाड हे अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात उतरले असून संघटनात्मक ताकद आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा पाठिंबा त्यांना मिळत असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कुरोशी येथील अभिषेक आत्माराम शिंदे यांनी उमेदवारी दाखल केली असून, पक्षनिष्ठ मतदारांवर त्यांची भिस्त आहे.
याशिवाय तळदेव गटात अनेक अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तापोळा येथील रेणुका अजित संकपाळ आणि धोंडीबा रामचंद्र धनावडे, तसेच देवळीमुरा येथील कृष्णा भगवान काळे हे अपक्ष उमेदवारही आपली स्वतंत्र ताकद दाखवत असून मतदारांशी थेट संपर्क साधत प्रचारात सक्रिय झाले आहेत.
एकाच गटात विविध पक्षांचे अधिकृत उमेदवार, दुहेरी अर्ज दाखल करणारे उमेदवार आणि अनेक अपक्ष यामुळे तळदेव गटातील निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. गावागावातील स्थानिक प्रश्न, विकासकामे, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण आणि रोजगार या मुद्द्यांवरून प्रचाराला वेग येत असून मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने झुकतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment