महाबळेश्वरच्या स्वाभिमानाची हाक; ‘भाग्यविधाते’ दादांच्या वारसाहक्कासाठी हिल रेंजचा आरपारचा निर्धार
महाबळेश्वरच्या स्वाभिमानाची हाक; ‘भाग्यविधाते’ दादांच्या वारसाहक्कासाठी हिल रेंजचा आरपारचा निर्धार
पाचगणी प्रतिनिधी
महाबळेश्वर : सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात ज्यांच्या शब्दाला एकेकाळी शासन मानले जायचे, ते स्वर्गीय बाळासाहेब भिलारे (दादा) आजही महाबळेश्वर तालुक्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांच्या निधनानंतर तालुक्याच्या राजकारणाने अनेक वळणे घेतली, सत्तांतराचे वादळ आले, पक्षांत फाटाफूट झाली, तरीही जनसामान्यांच्या मनात ‘दादा’ हे नाव अढळ राहिले. आज त्या भावनेलाच राजकीय आकार देण्यासाठी दादांच्या स्नुषा डॉ. तेजस्विनी भिलारे यांनी भिलार गणातून उमेदवारीसाठी शड्डू ठोकल्याने तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत असताना ज्या कुटुंबाने न डगमगता पक्षाची साथ दिली, त्या भिलारे कुटुंबाचा सन्मान होणार का, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. राजकीय स्थित्यंतराच्या काळात राजेंद्रशेठ राजपुरे यांनी पक्ष सावरला, हे मान्य असले तरी आजही सामान्य कार्यकर्ते आणि मतदारांच्या मनात ‘दादा’ प्रेम कायम आहे. या निष्ठेचा किल्ला म्हणजे भिलारचा ‘हिल रेंज’ परिसर. राज्यात कितीही राजकीय भूकंप झाले, तरी दादा प्रेमींची निष्ठा कधीच ढळली नाही, हे वास्तव आहे.
स्वर्गीय बाळासाहेब भिलारे यांनी शून्यातून विश्व उभे केले. आ. शशिकांत शिंदे आणि नामदार मकरंद आबा पाटील यांसारख्या नेत्यांच्या राजकीय जडणघडणीत भिलारच्या हिल रेंज परिवाराने स्वतःची ताकद पणाला लावली. दादांच्या पश्चात त्यांचे पुत्र नितीनदादा भिलारे हे कोणताही गाजावाजा न करता आजही पक्षकार्य निष्ठेने पुढे नेत आहेत. मात्र आता पक्षाकडून या निष्ठेच्या फळाची अपेक्षा व्यक्त होत असून, दादांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, अशी ठाम भावना कार्यकर्त्यांतून पुढे येत आहे.
डॉ. तेजस्विनी भिलारे या केवळ भिलारे कुटुंबातील स्नुषा म्हणून नव्हे, तर एक सुशिक्षित, अभ्यासू आणि आक्रमक महिला नेतृत्व म्हणून ओळख निर्माण करत आहेत. भिलार गणातील विकासकामे, महिलांचे संघटन, सामाजिक प्रश्नांवरील सक्रिय सहभाग यामुळे त्या सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय ठरत आहेत. पक्ष अडचणीत असताना खंबीरपणे पाठीशी उभे राहिलेल्या कुटुंबाचा विचार उमेदवारीत का होऊ नये, असा थेट सवाल दादा प्रेमींकडून केला जात आहे. उमेदवारी हा केवळ राजकीय निर्णय नसून, तो दादांच्या कार्याचा आणि योगदानाचा सन्मान असल्याची भावना परिसरात प्रकर्षाने जाणवते.
तालुक्यात राष्ट्रवादीकडून इच्छुकांची संख्या मोठी असली तरी केवळ संधीसाधूपणा आणि पिढ्यान्पिढ्या जोपासलेली निष्ठा यामध्ये मोठा फरक आहे, असे कार्यकर्ते सांगतात. नाराजांची समजूत काढणे आणि त्यांचे पुनर्वसन करणे हे नेतृत्वाचे कसब असते, मात्र ज्या कुटुंबाने तालुक्याचे राजकीय भाग्य घडवले, त्यांच्या हक्कावर गदा येणे अन्यायकारक ठरेल, अशी भावना व्यक्त होत आहे.
हिल रेंज परिवाराने आता स्पष्ट भूमिका घेतली असून, डॉ. तेजस्विनी भिलारे यांना उमेदवारी मिळाल्यास पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरण्याचा निर्धार करण्यात आला आहे. ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नसून दादांच्या कुटुंबाचे राजकीय अस्तित्व टिकवण्याची शेवटची संधी असल्याचे मानले जात आहे. “दादांनी आयुष्यभर इतरांना मोठे केले, आज त्यांच्या पश्चात त्यांच्या घरात उमेदवारी देऊन पक्षाने कृतज्ञता व्यक्त करावी,” अशी भावनिक हाक भिलार मतदारसंघातील निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून दिली जात आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते या भावनिक आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील प्रश्नावर काय निर्णय घेतात, ‘भाग्यविधात्या’ दादांच्या कुटुंबाला न्याय देतात का, याकडे आता केवळ महाबळेश्वरच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
Comments
Post a Comment