जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी ‘एक खिडकी’ योजना कार्यान्वित; परवान्यांसाठी उमेदवारांना दिलासा
जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी ‘एक खिडकी’ योजना कार्यान्वित; परवान्यांसाठी उमेदवारांना दिलासा
सातारा, दि. १७ —
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवार व राजकीय पक्षांना विविध परवान्यांसाठी वारंवार कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘एक खिडकी’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत तालुका व जिल्हास्तरावर निवडणूकविषयक सर्व परवान्यांची प्रक्रिया एका ठिकाणी सुलभपणे पार पडणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.
जिल्हास्तरावरील एक खिडकी कक्ष सातारा शहरातील अग्निशामक केंद्र, हुतात्मा चौक, करंजे नाका येथे स्थापन करण्यात आला आहे. या कक्षामार्फत निवडणूक प्रचार, सभा, मिरवणूक, ध्वनिक्षेपक वापर, वाहन परवाने तसेच अन्य आवश्यक निवडणूकविषयक परवान्यांसाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे उमेदवार व पक्ष प्रतिनिधींना विविध विभागांमध्ये स्वतंत्रपणे संपर्क साधण्याची गरज राहणार नाही, असा प्रशासनाचा उद्देश आहे.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी या एक खिडकी योजनेची नोंद घ्यावी आणि आवश्यक असणाऱ्या निवडणूकविषयक परवान्यांसाठी याच कक्षामार्फत संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, वेळेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावी यासाठी प्रशासनाकडून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या योजनेमुळे निवडणूक काळात उमेदवारांना येणाऱ्या अडचणी कमी होणार असून, प्रशासन व राजकीय पक्षांमधील समन्वय अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेली ही एक खिडकी योजना उमेदवारांसाठी मोठा दिलासा ठरणार असल्याचे चित्र आहे.
Comments
Post a Comment