मुक्तागिरी मलबार हिल येथे शिवसेनेचा शक्तिप्रदर्शनाचा सोहळा; दगडू दादा संकपाळ यांचा भव्य पक्षप्रवेश
मुक्तागिरी मलबार हिल येथे शिवसेनेचा शक्तिप्रदर्शनाचा सोहळा; दगडू दादा संकपाळ यांचा भव्य पक्षप्रवेश
महाबळेश्वर प्रतिनिधी —
शिवसेनेचा बुलंद आवाज आणि संघटनशक्ती पुन्हा एकदा मुंबईत घुमणार असून रविवार, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता मुक्तागिरी, मलबार हिल, मुंबई येथे भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात सातारा जिल्ह्यातील राजकारणातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे आणि ‘ढाण्या वाघ’ अशी ओळख असलेले लालबाग–परळचे माजी आमदार आदरणीय दगडू दादा संकपाळ शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश करणार आहेत.
हा पक्षप्रवेश शिवसेना मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ संभाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सातारा जिल्हा, महाबळेश्वर तालुका, सोळशी विभागातील वानवली आहिरे गावचे सुपुत्र असलेले दगडू दादा संकपाळ यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद पश्चिम महाराष्ट्रात आणखी बळकट होणार असल्याचे चित्र आहे.
या पक्षप्रवेशाला केवळ औपचारिक कार्यक्रम न मानता शिवसेनेच्या संघटनात्मक विस्ताराचा आणि राजकीय झंझावाताचा प्रारंभ म्हणून पाहिले जात आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना, सोळशी, कांदाटी परिसरातील तब्बल १०५ गावांचा विभाग, तसेच मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथील शिवसैनिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मुक्तागिरी परिसरात शिवसैनिकांचा प्रचंड उत्साह आणि शक्तिप्रदर्शन पाहायला मिळणार आहे.
शिवसेना तापोळा विभागाच्या वतीने सर्व शिवसैनिकांना आवाहन करण्यात आले असून, रविवार, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता मुक्तागिरी बंगला, मलबार हिल, मुंबई येथे उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, अशी नम्र विनंती करण्यात आली आहे. दगडू दादा संकपाळ यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी काळात सातारा जिल्ह्यात शिवसेनेचा प्रभाव अधिक दृढ होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Comments
Post a Comment