जैवविविधतेच्या रक्षणातूनच मानवी जीवन समृद्ध; डॉ. सुरेश प्रभू यांचे ठाम प्रतिपादन

जैवविविधतेच्या रक्षणातूनच मानवी जीवन समृद्ध; डॉ. सुरेश प्रभू यांचे ठाम प्रतिपादन

पुणे प्रतिनिधी  —

 पक्षी, तलाव, जमीन आणि जंगल ही मानवी जीवनाची मूलभूत साधनसंपत्ती असून त्यांच्याशिवाय जीवनाची समृद्धी शक्य नाही. मात्र अलीकडच्या काळात जंगलतोड, तलावांचे अतिक्रमण आणि जलस्रोतांचा ऱ्हास झपाट्याने वाढत असल्याने जैवविविधतेवर गंभीर संकट ओढावले आहे. त्यामुळे जैवविविधतेचे संरक्षण करणे ही आजची अत्यावश्यक गरज असल्याचे प्रतिपादन केंद्र सरकारचे माजी पर्यावरण, वाणिज्य व रेल्वे मंत्री डॉ. सुरेश प्रभू यांनी येथे केले.

महाराष्ट्र विकास केंद्रातर्फे दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘जलमित्र’ पुरस्कार ओडिशा येथील चिलिका जलाशय प्राधिकरणाचे निवृत्त कार्यकारी अधिकारी डॉ. अजितकुमार पटणायक यांना पुण्यात आयोजित कार्यक्रमात डॉ. सुरेश प्रभू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, रोख रक्कम, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी यशदाचे महासंचालक शेखर गायकवाड (आयएएस) आणि महाराष्ट्राच्या गॅझेटियर विभागाचे निवृत्त कार्यकारी संचालक डॉ. अरुणचंद्र पाठक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना डॉ. प्रभू म्हणाले की, जैवविविधता जपल्याशिवाय मानवी जीवन सुखी होऊ शकत नाही. ज्या भागात घनदाट जंगल आहे तेथे पाण्याचे नैसर्गिक स्रोत दीर्घकाळ टिकून राहतात. पाण्याच्या साठवणुकीमुळे मोठे तलाव निर्माण होतात आणि त्या पाण्यावरच जैवविविधतेची भरभराट होते. अशा परिसरात देशविदेशातून स्थलांतरित पक्षी येतात. पक्षी हे जैवविविधतेचे परिपूर्ण प्रतीक असून त्यांच्या माध्यमातून परागीकरण घडते. या प्रक्रियेमुळे शेती फुलते, अन्ननिर्मिती होते आणि मानवी जीवनचक्र सुरळीत चालते. त्यामुळे पाणी, तलाव, जमीन आणि जंगल यांचे संरक्षण हे मानवी अस्तित्वासाठी अनिवार्य आहे. शतकानुशतके पक्ष्यांनी जैवविविधता जपली असून, भविष्यात त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी व्यापक आणि दीर्घकालीन प्रयत्न उभारणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

चिलिका जलाशयाच्या संरक्षण व संवर्धनासाठी डॉ. अजितकुमार पटणायक यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा विशेष उल्लेख करताना डॉ. प्रभू यांनी सांगितले की, त्यांच्या कामामुळे भारतातील जलक्षेत्रात एक आदर्श निर्माण झाला आहे. अशा व्यक्तीला ‘जलमित्र’ पुरस्कार देऊन गौरव करण्याचा अभिमान महाराष्ट्र विकास केंद्राला वाटावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना डॉ. अजितकुमार पटणायक यांनी या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जागतिक पातळीपासून ते गावखेड्यांपर्यंत पाण्याची स्थिती गंभीर होत चालल्याकडे लक्ष वेधत त्यांनी जंगल आणि जलसाठ्यांचे संवर्धन करण्यासाठी समाजातील जाणत्या लोकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. भविष्यातील जलसंकट लक्षात घेता जलक्षेत्रात शाश्वत आणि भरीव काम करण्यासाठी तरुणांनी पुढे यावे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी शेखर गायकवाड आणि डॉ. अरुणचंद्र पाठक यांनीही आपले विचार मांडले. महाराष्ट्र विकास केंद्राचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर ह.भ.प. दत्ता मोरे यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजेंद्र शेलार, सुरेंद्र भोईटे, अजय शितोळे, सुनील जोशी आणि भारत माने यांचे विशेष योगदान लाभले.

या कार्यक्रमास निवृत्त सचिव दि. मा. मोरे, जलतज्ज्ञ डॉ. विजय परांजपे, अर्जुन पुरस्कार विजेते शांतारामबापू जाधव, हरणाई सूतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख, डॉ. एस. ए. कुलकर्णी, प्रफुलचंद्र झपके, राजेंद्र माहुलकर, डॉ. दत्ता देशकर, प्रा. मोहन पाटील, मेजर बी. जी. पचारणे, डॉ. कमलकांत वडेलकर यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. प्रदीप कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl