तळदेव गणात चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट; पंचायत समिती निवडणुकीत राजकीय रंगत शिगेला
तळदेव गणात चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट; पंचायत समिती निवडणुकीत राजकीय रंगत शिगेला
महाबळेश्वर प्रतिनिधी –
महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव गण पंचायत समिती निवडणुकीत अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी निवडणूक चित्र स्पष्ट झाले असून येथे चौरंगी लढत निश्चित झाली आहे. तळदेव गणातून एकूण आठ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. मात्र अर्ज माघारीच्या प्रक्रियेत संजय रामचंद्र गायकवाड, धोंडीबा रामचंद्र धनवडे, राजेश भीमराव संकपाळ आणि पांडुरंग सदाशिव सुतार यांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या चारवर येऊन ठेपली आहे.
अर्ज माघारीनंतर तळदेव गणातून संजय महादेव उतेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून, अभिषेक आत्माराम शिंदे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून, संजय विठ्ठल शेलार हे शिवसेना शिंदे गटाकडून तर गोविंद देवजी सकपाळ हे भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक मैदानात कायम आहेत. चार प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार समोरासमोर आल्याने तळदेव गणातील निवडणूक चुरशीची आणि लक्षवेधी ठरणार असल्याचे चित्र आहे.
महाबळेश्वर तालुक्यात आधीपासूनच पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीचे वातावरण तापले असून तळदेव गणातील ही चौरंगी लढत संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेत आहे. स्थानिक विकासकामे, पाणीपुरवठा, रस्ते, रोजगार, पर्यटन आणि ग्रामविकासाचे मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी राहणार असून प्रत्येक उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे.
चारही पक्षांनी स्वतंत्र ताकद दाखवण्याची तयारी केल्याने मतांचे विभाजन होण्याची शक्यता असून कोण बाजी मारणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. येत्या काही दिवसांत प्रचाराची तीव्रता आणखी वाढणार असून तळदेव गणातील ही चौरंगी लढत महाबळेश्वर तालुक्यातील निवडणुकीचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
Comments
Post a Comment