बेल्जियमच्या विद्यार्थ्यांनी कुंभरोशीतील विद्यार्थ्यांशी साधला संस्कृती, शिक्षण आणि मैत्रीचा सेतू
बेल्जियमच्या विद्यार्थ्यांनी कुंभरोशीतील विद्यार्थ्यांशी साधला संस्कृती, शिक्षण आणि मैत्रीचा सेतू
कुंभरोशी प्रतिनिधी:
आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाणघेवाणीचा सुंदर अनुभव कुंभरोशी गावात पाहायला मिळाला. बेल्जियम देशातील विद्यार्थ्यांनी कुंभरोशी गावाला भेट देत येथील कुंभरोशी शाळा, नवेनगर शाळा आणि कुंभरोशी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. या भेटीतून केवळ शैक्षणिक माहितीची देवाणघेवाणच नव्हे, तर विविध संस्कृती, जीवनशैली आणि परंपरांचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला.
या कार्यक्रमात कुंभरोशी व नवेनगर शाळेतील तसेच बेल्जियममधील शाळेतील विद्यार्थ्यांनी एकत्र येत सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. गीत, नृत्य आणि विविध सादरीकरणांतून विद्यार्थ्यांनी आपापल्या देशांची संस्कृती मांडली. यानंतर बेल्जियमच्या विद्यार्थ्यांनी कुंभरोशी परिसरातील स्ट्रॉबेरी शेतीला भेट देऊन स्थानिक शेतीपद्धतीची माहिती घेतली. गावातील घरांना दिलेल्या भेटीत ग्रामीण जीवनशैलीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला, तसेच चुलीवर बनवलेल्या भाकरीसह पारंपरिक खाद्यपदार्थांची चव चाखत त्यांनी भारतीय संस्कृतीचा खास आस्वाद घेतला.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना शैक्षणिक व खेळाचे साहित्य भेट म्हणून देण्यात आले. सेंट पीटर्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनीही शाळांना भेट देत आपला सहभाग नोंदवला. या उपक्रमात कांचन सावंत, सचिन सपकाळ, सखाराम ढेबे, बुवा, रांजणे सर यांच्यासह महिला पालक, हायस्कूलचे मुख्याध्यापक, विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आंतरराष्ट्रीय संवादामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनात व्यापकता येत असून परस्पर सन्मान, मैत्री आणि जागतिक नागरिकत्वाची भावना अधिक दृढ होत आहे. कुंभरोशी गावात घडलेला हा उपक्रम शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील एक संस्मरणीय व प्रेरणादायी अनुभव ठरला.
Comments
Post a Comment