चिता शांत होऊ दे… राजकारण नंतरही करता येईल

चिता शांत होऊ दे… राजकारण नंतरही करता येईल

दादांचं पार्थिव अजून मातीला मिळालेलं नाही, चितेची राखही थंड झालेली नाही आणि इकडे वारसदार, पदं, पक्ष, विलिनीकरण, मंत्रीपदं यांची चर्चा उघडपणे सुरू झाली आहे. दुःखाचा औपचारिक चेहरा ठेवून आतून सत्तेची बेरीज-वजाबाकी सुरू असण्याचं हे चित्र केवळ अस्वस्थ करणारे नाही, तर लोकशाही, राजकारण आणि माणुसकी यावरच प्रश्नचिन्ह उभं करणारे आहे.

दादा म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हती, तर एक राजकीय शैली होती. निर्णयक्षमता, थेटपणा, मिश्किल टोले आणि गरज पडली तर कठोर शब्दांत जागेवर बसवण्याची ताकद — या सगळ्याचं मिश्रण म्हणजे अजीतदादा. चार दशकं त्यांनी हीच शैली जपली. त्यांच्या हयातीत त्यांच्या नावावर बोलणं, त्यांच्या मागे लपून बडबड करणं कुणाची हिंमत नव्हती. पण पाठ फिरताच जी बेताल चर्चा सुरू झाली, ती दादांच्या चाहत्यांना, समर्थकांना आणि सामान्य जनतेला संतापात ढकलणारी आहे.

मिडियाला वेग हवा असतो, हे मान्य. पण वेग आणि संवेदनशीलता यामधील सीमारेषा ओलांडली तर तो वेग निर्घृण ठरतो. चिता पेटल्यानंतर काही मिनिटांतच “पुढचा कोण?”, “कोणतं पद कुणाला?”, “पक्ष कुठे जाणार?” असे प्रश्न विचारले जात असतील, तर ते पत्रकारितेचं कर्तव्य न राहता राजकीय दलालीचं रूप धारण करतं. दुःख अजून ओघळत असताना त्याच अश्रूंमधून सत्तेचा मार्ग शोधणं हा समाज म्हणून आपल्याच अपयशाचा दाखला आहे.

अधिक दुर्दैवी बाब म्हणजे ही घाई केवळ मिडियापुरती मर्यादित नाही. दादांच्याच पक्षातील नेते, आमदार, मंत्री कालपर्यंत हंबरडून रडत होते आणि आज “पक्षाचं पुढे काय?” यावर बाईट देताना दिसतात. घरातील प्रश्न घरच्यांनी बसून सोडवायचे असतात, हे साधं भानही हरपलेलं दिसतं. बाहेरून सल्ले, आदेश आणि भविष्यवाण्या करणारे काही जण तर पवार कुटुंबाच्या निर्णयांवरच आपली मक्तेदारी असल्यासारखे वागत आहेत.

दादांची राजकीय ऐहसिकता समजून न घेता केलेलं विश्लेषण म्हणजे इतिहासाशी केलेली बेईमानी आहे. ज्यांनी कधी मान तुकवली नाही, ज्यांनी सत्ता असूनही विचारधारेला गहाण ठेवलं नाही, अशा नेत्याच्या पश्चात लगेचच पक्षफुटी, विलिनीकरण, पदवाटप यांची चर्चा सुरू होणं हे त्यांच्या संपूर्ण प्रवासाचं अवमूल्यन आहे. विश्लेषण करायचंच असेल, तर दादांच्या उंचीप्रमाणे करा; स्वतःच्या लायकीप्रमाणे नाही.

लोकशाहीत प्रश्न विचारण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. पण प्रत्येक अधिकारासोबत जबाबदारीही येते. शोकाकुल समाजाच्या भावनांचा आदर ठेवणं, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आज लोक शांत आहेत, शोकमग्न आहेत; पण हा संयम गैरसमजून घेतला गेला, तर उद्याचा संताप अधिक तीव्र असेल.

दादांची चिता शांत होऊ द्या. पुढचे प्रश्न निर्माण होतीलच, त्यांची उत्तरंही मिळतील. पण आज नाही. आज राजकारण थांबायला हवं. आज फक्त माणूस म्हणून शोक व्यक्त करायला हवा. कारण एक गोष्ट सगळ्यांनाच ठाऊक आहे —
दादा हयात असते तर…
अशी घाई, अशी बडबड, आणि असा अनादर त्यांनी कधीच खपवून घेतला नसता.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl