महाबळेश्वरमध्ये पंचायत समिती निवडणुकीची धग वाढली; आज १२ उमेदवारांचे अर्ज, महायुतीतील पक्ष थेट आमनेसामने

महाबळेश्वरमध्ये पंचायत समिती निवडणुकीची धग वाढली; आज १२ उमेदवारांचे अर्ज, महायुतीतील पक्ष थेट आमनेसामने

महाबळेश्वर प्रतिनिधी –

महाबळेश्वर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल होताच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आजच्या दिवशी एकूण १२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून सकाळपासूनच तहसीलदार कार्यालय परिसरात कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत महाबळेश्वर मार्केट परिसरातून भव्य रॅली काढली आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसीलदार कार्यालयाकडे कूच केले.

ढोल-ताशांच्या गजरात, जोरदार घोषणाबाजी आणि पक्षांच्या झेंड्यांमुळे संपूर्ण बाजारपेठेचे वातावरण राजकीय रंगात रंगून गेले होते. उमेदवारांसोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाल्याने तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात काही काळ प्रचंड गर्दी झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल होत असून महत्त्वाची बाब म्हणजे राज्यात व केंद्रात एकत्र असलेले महायुतीतील पक्षच महाबळेश्वर तालुक्यात एकमेकांविरोधात थेट निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक केवळ स्थानिक विकासापुरती मर्यादित न राहता प्रतिष्ठेची आणि ताकद दाखवणारी ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शेती, पर्यटन विकास, पाणीपुरवठा, रस्ते, रोजगार आणि ग्रामविकास हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवून उमेदवार प्रचारात उतरणार असल्याने येत्या काही दिवसांत प्रचाराची धग आणखी वाढण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस असून अद्याप भाजपकडून अधिकृत उमेदवारांची घोषणा झालेली नाही, तसेच शिवसेनेचे पूर्व भागातील काही उमेदवारांचे अर्जही अद्याप दाखल झालेले नाहीत. हे सर्व अर्ज उद्या शेवटच्या दिवशी दाखल होणार असल्याचे निश्चित झाल्याने उद्या तहसीलदार कार्यालय परिसरात पुन्हा मोठी गर्दी आणि राजकीय हालचाली पाहायला मिळणार आहेत.

उमेदवारी अर्जांची छाननी, माघारी आणि अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर महाबळेश्वर तालुक्यातील पंचायत समितीची निवडणूक खऱ्या अर्थाने चुरशीची आणि रंगतदार होणार हे निश्चित मानले जात आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl