खादीतून महिलांना स्वावलंबनाचा नवा मार्ग; जावळी तालुक्यातील दापवडी गाव ठरणार ‘खादीचे गाव’
खादीतून महिलांना स्वावलंबनाचा नवा मार्ग; जावळी तालुक्यातील दापवडी गाव ठरणार ‘खादीचे गाव’
मेढा प्रतिनिधी :
खादी फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचा संकल्प अश्विनी पाबळे यांनी मांडला असून जावळी तालुक्यातील दापवडी गाव लवकरच ‘खादीचे गाव’ म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खादी ही केवळ वस्त्रनिर्मितीपुरती मर्यादित न राहता गावागावांतील महिलांसाठी रोजगार आणि सन्मानजनक उपजीविकेचे साधन बनावी, या उद्देशाने हे कार्य सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या पाच ते सात वर्षांपासून त्या खादी क्षेत्रात सक्रियपणे काम करत असून खादीचा जास्तीत जास्त प्रसार कसा करता येईल आणि नव्या पिढीला खादीशी कसे जोडता येईल, यावर त्यांचा भर आहे. बदलत्या काळात खादी आधुनिक पद्धतीने सादर करत तिची मूल्ये जपण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. खादीकडे केवळ उत्पादन म्हणून न पाहता त्यातून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती कशी करता येईल, हा त्यांचा मुख्य विचार आहे.
बंगाल, दक्षिण भारत आणि गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर खादीचे उत्पादन होत असले तरी पाचगणी आणि आसपासच्या ग्रामीण भागात काम करताना वेगळीच परिस्थिती दिसून आली, असे अश्विनी पाबळे यांनी सांगितले. येथील अनेक महिलांना उन्हात, पावसात किंवा थंडीत लांब अंतरावर मजुरीसाठी जावे लागते, ही बाब त्यांच्या लक्षात आली. या वास्तवातूनच घरबसल्या रोजगार उपलब्ध करून देण्याची संकल्पना पुढे आली.
ग्रामीण भागातील महिलांसाठी घराबाहेर जाऊन काम करणे अनेकदा सामाजिक आणि कौटुंबिक कारणांमुळे कठीण ठरते. त्यामुळे महिलांना त्यांच्या घरातच खादीशी संबंधित काम देऊन त्यांना नियमित उत्पन्नाचे साधन मिळावे आणि त्या आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हाव्यात, हेच खादी फाउंडेशनचे मुख्य उद्दिष्ट आहे. या उपक्रमातून महिलांचा आत्मविश्वास वाढेल, कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि गावाच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर जावळी तालुक्यातील दापवडी गाव खादी उत्पादन व प्रशिक्षणाचे केंद्र म्हणून विकसित करण्याचा संकल्प करण्यात आला असून लवकरच हे गाव ‘खादीचे गाव’ म्हणून नावारूपास येणार आहे. स्थानिक महिलांना प्रशिक्षण, काम आणि बाजारपेठ उपलब्ध करून देत खादीच्या माध्यमातून स्वावलंबनाचा नवा अध्याय जावळीत सुरू होत असल्याचे चित्र यामुळे स्पष्ट झाले आहे.
Comments
Post a Comment