महाबळेश्वरवर शोककळा; ‘दादा’ हरपल्याने शहर स्तब्ध, शोकसभेत नेत्यांसह नागरिक भावूक

महाबळेश्वरवर शोककळा; ‘दादा’ हरपल्याने शहर स्तब्ध, शोकसभेत नेत्यांसह नागरिक भावूक

महाबळेश्वर, दि. २८ प्रतिनिधी :

महाराष्ट्राच्या राजकारणातील धडाडीचे नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित ‘दादा’ पवार यांच्या अकाली निधनाच्या वृत्ताने महाबळेश्वरवर आज शोककळा पसरली. थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे आणि कायम पर्यटकांनी गजबजलेले हे शहर एका क्षणात शांत झाले. दादांच्या निधनाची बातमी समजताच मुख्य बाजारपेठ उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आली आणि सर्व स्तरांतील नागरिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेते सुभाषचंद्र बोस चौकात एकत्र आले. येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष शोकसभेत अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

बारामती येथे बुधवारी सकाळी झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात अजित दादा पवार यांचे निधन झाल्याची माहिती मिळताच महाबळेश्वरमधील वातावरण बदलले. पर्यटन व्यवसायामुळे नेहमीच चैतन्याने भरलेले रस्ते, चौक आणि बाजारपेठा स्तब्ध झाल्या. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवत दादांना मानवंदना दिली, तर हॉटेल व्यावसायिक, टॅक्सी संघटना आणि स्थानिक रहिवाशांनीही व्यवहार थांबवून शोक व्यक्त केला.

मुख्य बाजारपेठ परिसरात झालेल्या शोकसभेला नगराध्यक्ष सुनील शिंदे, उपनगराध्यक्ष नासीर मुलाणी, मुख्याधिकारी योगेश पाटील, भाजपचे नगरसेवक रवींद्र कुंभारदरे, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, माजी नगराध्यक्षा विमलताई पार्टेव यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे, नगरसेवक ॲड. संजय जंगम, संतोष शिंदे, रोहित ढेबे, राहुल पिसाळ, नगरसेविका संगीता वाडकर, विद्या बावळेकर, रेश्मा ढेबे, दत्ताजी वाडकर, मधुकर साळुंखे, उषाताई ओंबळे, संदीप साळुंखे, ज्योती वागदरे, भक्ती जाधव, अर्बन संचालक सतीश ओंबळे, अनिल साळुंखे, नितीन साळुंखे, महेश गुजर, प्रभाकर देवकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

शोकसभेदरम्यान बोलताना अनेक स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत पाणी दाटले होते. “अजित दादा म्हणजे केवळ एक राजकारणी नव्हते, तर प्रशासनाचा कणा होते. सकाळी लवकर कामाला सुरुवात करून वेगाने निर्णय घेणारा असा कर्तव्यदक्ष नेता पुन्हा होणे कठीण आहे,” अशा शब्दांत वक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. महाबळेश्वरच्या पर्यटन विकासासाठी, पायाभूत सुविधा उभारणीसाठी तसेच येथील स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी दादांनी नेहमीच ठाम भूमिका घेतली होती, याची आठवण उपस्थितांनी करून दिली.

विशेषतः स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय, पर्यटनाशी संबंधित विकासकामांसाठी उपलब्ध करून दिलेला निधी आणि प्रशासकीय शिस्त यामुळे अजित दादा महाबळेश्वरच्या जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण करून गेले होते. त्यांच्या जाण्याने केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिक आणि आर्थिक पातळीवरही मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

दादांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर नगरपालिकेच्या वतीने विशेष शोकप्रस्ताव मंजूर करण्यात आला असून, पुढील तीन दिवस शहरात कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या तीन दिवसांच्या दुखवट्याचे महाबळेश्वरमध्ये काटेकोर पालन करण्यात येत आहे. शहरातील विविध ठिकाणी अजित दादांचे फलक लावून ‘जनतेचा नेता’ म्हणून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे, तर कार्यकर्त्यांकडून “अजित दादा अमर रहे”च्या घोषणांनी परिसर भारावून गेला.

प्रशासनाकडून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले असून, संपूर्ण महाबळेश्वर आपल्या लाडक्या ‘दादां’ना अखेरचा निरोप देताना शोकमग्न झाले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl