यळकोट सेवा प्रतिष्ठानची भव्य द्वादश मल्हार वारी २० फेब्रुवारीपासून


यळकोट सेवा प्रतिष्ठानची भव्य द्वादश मल्हार वारी २० फेब्रुवारीपासून

पुणे प्रतिनिधी :

यळकोट सेवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी श्रद्धा, शिस्त आणि मल्हार परंपरेचा वारसा जपत आयोजित करण्यात येणारी द्वादश मल्हार वारी यंदा नव्या तारखांनुसार दि. २० फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुका, महाशिवरात्रीचा पवित्र योग आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती या तीनही महत्त्वाच्या धार्मिक व सामाजिक घटनांचा सखोल विचार करूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

यळकोट सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शशिकांत (बापू) उभे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि द्वादश मल्हार वारीचे अध्यक्ष माऊली काळोखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रशासन, स्वयंसेवक, वारकरी आणि स्थानिक कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता, पोलीस व प्रशासकीय यंत्रणांवरील ताण, तसेच लाखो भाविकांची सुरक्षितता व सोयीसुविधा लक्षात घेता २० फेब्रुवारी ही तारीख सर्वार्थाने योग्य ठरत असल्याचे डॉ. शशिकांत (बापू) उभे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना डॉ. शशिकांत उभे म्हणाले की, द्वादश मल्हार वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून मल्हार भक्तांची एक सशक्त आध्यात्मिक चळवळ आहे. श्रद्धा, शिस्त आणि सेवाभाव या त्रिसूत्रीवर उभी असलेली ही वारी समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. त्यामुळे नियोजनापासून ते वारीच्या समारोपापर्यंत प्रतिष्ठान पूर्ण क्षमतेने कार्यरत राहणार आहे.

वारीचे अध्यक्ष माऊली काळोखे यांनी सांगितले की, यंदाच्या वारीला महाशिवरात्रीचा पवित्र आध्यात्मिक योग आणि शिवजयंतीचा ऐतिहासिक गौरव लाभणार असून या दोन्हींचा संगम वारकऱ्यांना एक वेगळाच अनुभव देणारा ठरेल. संस्थापक अध्यक्ष डॉ. शशिकांत उभे स्वतः प्रत्येक टप्प्यावर लक्ष ठेवत असल्याने वारी अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि भक्तिमय वातावरणात पार पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या द्वादश मल्हार वारीदरम्यान महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांतील विविध प्राचीन व प्रसिद्ध मल्हार, खंडोबा आणि संबंधित देवस्थानांचे दर्शन वारकऱ्यांना घडणार आहे. वारीदरम्यान पारंपरिक अभिषेक, भूपाळी, आरती, भजन-कीर्तन, हरिनाम गजर तसेच मल्हार परंपरेनुसार धार्मिक विधी मोठ्या भक्तिभावात पार पडणार आहेत.

वारीत सहभागी होणाऱ्या भाविक व वारकऱ्यांसाठी सकाळचा चहा-नाश्ता, दुपारचे व रात्रीचे भोजन, स्वच्छ आणि सुरक्षित निवास व्यवस्था, मोफत वैद्यकीय सेवा, आपत्कालीन मदत पथक तसेच भंडाऱ्याची सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे. यापूर्वी नोंदणी केलेल्या सर्व वारकऱ्यांची नोंद कायम राहणार असून, नव्या तारखांनुसार संपूर्ण नियोजन अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

यळकोट सेवा प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. शशिकांत (बापू) उभे आणि अध्यक्ष माऊली काळोखे यांनी संयुक्तपणे स्वयंसेवक, वारकरी आणि मल्हार भक्तांना तारखांतील बदलाची नोंद घ्यावी आणि अधिकाधिक संख्येने द्वादश मल्हार वारीत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. धार्मिक श्रद्धा, सामाजिक ऐक्य आणि सेवाभाव यांचा आदर्श घालून देणारी ही द्वादश मल्हार वारी यंदा ऐतिहासिक ठरेल, असा ठाम विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl