‘भाग्यविधात्यांच्या’ घरालाच डावलले? भिलारे कुटुंबाच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत नाराजीचे नाट्य

‘भाग्यविधात्यांच्या’ घरालाच डावलले? भिलारे कुटुंबाच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत नाराजीचे नाट्य

महाबळेश्वर प्रतिनिधी –

महाबळेश्वर तालुक्याचे भाग्यविधाते, समाजभूषण अशा अनेक सन्मानांनी जनतेने गौरवलेले स्वर्गीय बाळासाहेब भिलारे यांच्या नावाला तालुक्यात आजही वेगळे वजन आहे. ज्यांच्या शब्दावर कधी शासन आणि प्रशासन हालचाल करत होते, आणि ज्यांच्यासाठी कार्यकर्ते सदैव तत्पर राहत होते, अशा बाळासाहेब भिलारे यांच्या कुटुंबालाच राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल, अशी खात्री सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते ज्येष्ठ नेत्यांपर्यंत होती. मात्र प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी बाळासाहेब भिलारे यांच्या कुटुंबातील उमेदवारी डावलल्याने तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

भिलार गणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वर्गीय बाळासाहेब भिलारे यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या प्रवीण भिलारे यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आल्याची घोषणा होताच, पक्षांतर्गत नाराजीचा सूर अधिकच तीव्र झाला. बाळासाहेब भिलारे यांच्या कुटुंबाला डावलून इतरांना तिकीट देण्यामागे ‘मी साहेबांसाठी हे केले, ते केले’ असे सांगत काहींनी तिकीट मिळवले असल्याच्या चर्चांनी कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम आणि असंतोष निर्माण केला आहे.

या पार्श्वभूमीवर बाळासाहेब भिलारे यांच्या सुनबाई तेजस्विनी भिलारे यांनी केलेले वक्तव्य विशेष लक्षवेधी ठरत आहे. “जर तुम्ही साहेबांसाठी एवढे केले असेल, तर ते उपकार नव्हतेच का? आणि जर उपकार केले असतील, तर त्याच उपकारांची परतफेड म्हणून आज हे तिकीट तुम्हाला देण्यात आले आणि आम्हाला नाकारण्यात आले,” अशा शब्दांत त्यांनी आपली तीव्र भावना व्यक्त केल्याची चर्चा आहे. या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता आणखी वाढली असून, कार्यकर्त्यांच्या भावना उघडपणे व्यक्त होऊ लागल्या आहेत.

बाळासाहेब भिलारे यांना मानणारा मोठा कार्यकर्ता वर्ग आजही तालुक्यात सक्रिय असून, त्यांच्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाविरोधात दबक्या आवाजात नाराजी व्यक्त केली जात आहे. “साहेब जिवंत असते तर अशी परिस्थिती उद्भवलीच नसती,” अशी भावना अनेक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. पक्ष नेतृत्वाने हा निर्णय का घेतला, याबाबत अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट झालेली नसली तरी या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेससमोर डॅमेज कंट्रोलचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

एकीकडे निवडणूक रणधुमाळी वेग घेत असताना, दुसरीकडे बाळासाहेब भिलारे यांच्या नावाने एकसंघ असलेला कार्यकर्ता वर्ग नाराज झाल्यास त्याचा थेट परिणाम निवडणुकीच्या गणितावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या नाराजीवर राष्ट्रवादी काँग्रेस कसा तोडगा काढते, याकडे आता संपूर्ण महाबळेश्वर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl