कुंभरोशी गणाच्या विकासासाठी शिवसेनेचे संजय मोरे सरसावले; शक्तीप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल
कुंभरोशी प्रतिनिधी —
येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी गणातून शिवसेना (एकनाथ शिंदे गट)ने आपल्या निष्ठावान व सक्रिय कार्यकर्ते संजय मोरे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. आज अत्यंत उत्साही वातावरणात, भगवेमय झालेल्या परिसरात आणि कार्यकर्त्यांच्या अलोट गर्दीत संजय मोरे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
अर्ज दाखल करताना काढण्यात आलेल्या रॅलीत कुंभरोशी गणातील विविध गावांमधून शिवसैनिक, युवक, महिला तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि भगव्या झेंड्यांच्या लाटेत उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीचे वातावरण तापल्याचे चित्र दिसून आले. संजय मोरे यांच्या नावाने कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत आपला पाठिंबा जाहीर केला.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय मोरे यांनी कुंभरोशी गणाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस ‘शिवसंकल्प’ घेऊन आपण मैदानात उतरल्याचे स्पष्ट केले. कुंभरोशी परिसरातील पर्यटन स्थळांचा विकास करून स्थानिक युवकांना शाश्वत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, शेतीपंपांच्या अडचणी सोडवून सिंचन आणि पाणी नियोजनावर भर देणे, दुर्गम वाड्या-वस्त्यांपर्यंत सुसज्ज आरोग्य सेवा पोहोचवणे तसेच सरकारी योजनांचा लाभ थेट शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून युवक व महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवणे, या मुद्द्यांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ही निवडणूक शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संघटनेच्या ताकदीवर लढवली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. स्थानिक पातळीवरील पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिकांनी संजय मोरे यांच्या विजयासाठी कंबर कसली असून प्रचाराला वेग आला आहे. सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी सातत्याने रस्त्यावर उतरून काम करण्याची संजय मोरे यांची ओळख आणि दांडगा जनसंपर्क यामुळे गणातील मतदारांचा कल त्यांच्या बाजूने झुकताना दिसत आहे.
आज झालेल्या अर्ज सादरीकरणाच्या वेळी कुंभरोशी गणातील गावागावातून आलेल्या नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती. “सामान्यांच्या हक्काचा माणूस यंदा पंचायत समितीत जाणार,” असा विश्वास अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. संजय मोरे यांच्या उमेदवारीमुळे कुंभरोशी गणात निवडणुकीची चुरस अधिकच वाढली असून विकासाच्या मुद्द्यावर कोण बाजी मारणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment