प्रजासत्ताक दिनी पाचगणीत स्वच्छतेचा संदेश देणारा अनोखा थीम फ्लोट, सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान
प्रजासत्ताक दिनी पाचगणीत स्वच्छतेचा संदेश देणारा अनोखा थीम फ्लोट, सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान
पाचगणी प्रतिनिधी –
पाचगणी शहरात प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या संचलनात यंदा स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनाचा प्रभावी संदेश देणारा विशेष थीम फ्लोट सादर करण्यात आला. पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद आणि नेस्ले समर्थित हिलदारी अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेला हा फ्लोट पाचगणीमध्ये प्रथमच कचरा व्यवस्थापन आणि सफाई कर्मचाऱ्यांवर आधारित असल्याने नागरिकांसह पर्यटकांचेही विशेष लक्ष वेधून घेणारा ठरला.
या थीम फ्लोटमधून “Not all heroes wear capes, some keep Panchgani clean everyday” या प्रभावी संदेशाच्या माध्यमातून स्वच्छता कर्मचारी हेच शहराचे खरे नायक असल्याची जाणीव करून देण्यात आली. ओला कचरा, सुका कचरा, घरगुती घातक कचरा आणि बायोमेडिकल कचरा यांचे योग्य वर्गीकरण प्रत्यक्ष स्वरूपात दाखवण्यात आल्याने कचरा विलगीकरणाचे महत्त्व नागरिकांना सहज समजले. “आपला कचरा – आपली जबाबदारी” या घोषवाक्यामुळे प्रत्येक नागरिकाची स्वच्छतेतील वैयक्तिक जबाबदारी अधोरेखित करण्यात आली.
या फ्लोटचे उद्घाटन पाचगणीचे नगराध्यक्ष मा. श्री. दिलीप भाऊ बगाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपनगराध्यक्ष मा. श्री. प्रकाश गोळे, नगरसेवक श्री. शेखर कासुर्डे, नगरसेवक श्री. राजेंद्र पार्टे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. पंडित पाटील, पालिकेचे अधिकारी व कर्मचारी, हिलदारी अभियानाचे डॉ. मुकेश कुळकर्णी तसेच त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती.
नगरपरिषदेच्या वतीने सांगण्यात आले की, हा उपक्रम केवळ प्रजासत्ताक दिनापुरता मर्यादित नसून, हिलदारी अभियानाच्या सहकार्याने ‘माझी वसुंधरा’ आणि ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अंतर्गत कचरा विलगीकरण, स्वच्छता जनजागृती आणि सफाई मित्रांसाठी विविध उपक्रम सातत्याने राबवण्यात येत आहेत. या माध्यमातून शहरात शाश्वत आणि प्रभावी स्वच्छता व्यवस्थापन उभे राहील, असा विश्वास नगरपरिषदेकडून व्यक्त करण्यात आला.
या उपक्रमाचे नागरिकांनी मनापासून स्वागत करत “स्वच्छ पाचगणी – सुंदर पाचगणी” या संकल्पनेला आपला पाठिंबा दर्शविला. स्वच्छतेचा हा सकारात्मक संदेश शहरभर पोहोचत पाचगणीच्या स्वच्छ आणि सुंदर भविष्यासाठी नवी प्रेरणा देणारा ठरला.
Comments
Post a Comment