कुंभरोशी गणात अपक्ष सनी मोरे मैदानात; तिन्ही पक्षांची वाढली डोकेदुखी
कुंभरोशी प्रतिनिधी –
कुंभरोशी गणामध्ये सनी मोरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महाबळेश्वर तालुक्यातील राजकीय समीकरणे ढवळून निघाली असून शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या तिन्ही पक्षांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपमधील सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले सनी अशोक मोरे यांनी निवडणूक रिंगणात अपक्ष म्हणून उडी घेतल्यामुळे ही लढत अधिकच चुरशीची ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
महाबळेश्वर तालुक्यात सनी मोरे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने समाजकार्य करत सर्व स्तरांमध्ये भक्कम जनसंपर्क निर्माण केला आहे. युवक वर्गात त्यांची विशेष लोकप्रियता असून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी अनेक वेळा प्रभावीपणे केले आहे. अडचणीत सापडलेल्या नागरिकांना मार्ग काढून देणारा आणि पर्याय शोधून देणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
कामगार संघटना असोत, स्वयंरोजगार करणारे नागरिक असोत, प्रतापगडावर जाणारे व्यावसायिक असोत किंवा नगरपालिकेचे कर्मचारी असोत, प्रत्येक घटकाच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी सनी मोरे यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून प्रयत्न केले आहेत. वेळप्रसंगी त्यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची मदत घेत जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला असून या सातत्यपूर्ण कार्यामुळे त्यांच्याविषयी जनतेमध्ये विश्वास निर्माण झाला आहे.
या कार्याची दखल घेत सर्वसामान्य नागरिकांमध्ये सनी मोरे यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हीच वाढती लोकप्रियता आता तिन्ही प्रमुख पक्षांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत युतीतील तिन्ही पक्ष एकमेकांविरोधातच निवडणूक लढवत असल्याने तालुक्यात युती अबाधित राहिलेली नाही. प्रत्येक पक्ष आपापली ताकद आजमावत असताना सनी मोरे यांच्या अपक्ष उमेदवारीने ही निवडणूक आणखी रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या उमेदवारीचा फटका नेमका कोणत्या पक्षाला बसणार, याबाबत तालुक्यात सर्वत्र चर्चांना उधाण आले असून कुंभरोशी गणातील निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
---
Comments
Post a Comment