नांदलमधील अनधिकृत गौण खनिज उत्खननावर अखेर कारवाईचा हातोडा; सुशांत मोरे यांच्या आमरण उपोषणाचा प्रशासनावर परिणाम
नांदलमधील अनधिकृत गौण खनिज उत्खननावर अखेर कारवाईचा हातोडा; सुशांत मोरे यांच्या आमरण उपोषणाचा प्रशासनावर परिणाम
सातारा – प्रतिनिधी
फलटण तालुक्यातील नांदल गावच्या हद्दीतील गट क्रमांक ५९२, ५९३, ५९५, ५९६, ५९७ आणि ६३४ या क्षेत्रांमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत गौण खनिज उत्खनन प्रकरणी अखेर प्रशासनाने ठोस पाऊल उचलले असून उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी संबंधित ठिकाणी ईटीएस मोजणी करण्याचे आदेश दिले आहेत. सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी या प्रकरणाकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केल्यानंतर ही कारवाई झाली असून त्यांच्या आंदोलनाला यश मिळाले आहे.
नांदल परिसरात महसूल विभाग आणि वनविभागाच्या कथित संगनमताने मोठ्या प्रमाणावर अनधिकृत उत्खनन व क्रशर उद्योग सुरू असल्याचा आरोप करण्यात येत होता. या उत्खननामुळे संपूर्ण परिसरात धुरळ्याचे साम्राज्य पसरले असून शेती, पर्यावरण आणि वन्यजीवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे होते. या गंभीर बाबींकडे वारंवार लक्ष वेधूनही फलटण महसूल विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत सुशांत मोरे यांनी प्रजासत्ताक दिनापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.
या आंदोलनाची दखल घेत उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी संबंधित अनधिकृत गौण खनिज उत्खननाची ईटीएस मोजणी करण्याचे आदेश दिले. यामुळे उत्खननाच्या नेमक्या प्रमाणाची तपासणी होऊन पुढील कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे नांदल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुशांत मोरे यांनी महसूल, पोलीस, वनविभाग, सहकार, जिल्हा परिषद, नगरविकास आदी विभागांशी संबंधित विविध विषयांवरील कथित गैरप्रकार, चुकीच्या घडलेल्या घटना आणि भ्रष्टाचाराविरोधातही आमरण उपोषण सुरू केले होते. नांदल प्रकरणासह इतर काही मागण्यांवर संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासने दिली, तर आचारसंहितेचे कारण पुढे करत काही प्रकरणांत चौकशी व कारवाईसाठी मुदत मागण्यात आली.
प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर नगरपालिका उपायुक्त बापट यांच्या हस्ते सरबत देऊन सुशांत मोरे यांचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले. प्रशासनाने विविध मागण्यांबाबत ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिल्याने आपण उपोषण स्थगित करत असल्याचे सुशांत मोरे यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक मनोज शेंडे, शंकर माळवदे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment