जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज; ५०९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेचे पहिले सखोल प्रशिक्षण
जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज; ५०९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेचे पहिले सखोल प्रशिक्षण
महाबळेश्वर प्रतिनिधी :
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुका पारदर्शक, शांततेत व नियमबद्ध पद्धतीने पार पडाव्यात यासाठी निवडणूक प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू असून, त्याचाच भाग म्हणून मतदान कामी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण सत्र आज शुक्रवार दि. २४ जानेवारी २०२६ रोजी महाबळेश्वर येथे उत्साहात पार पडले. या प्रशिक्षण सत्रात निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली राजमाने यांनी प्रत्यक्ष मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणाच्या प्रारंभी राजमाने यांनी मतदान प्रक्रिया ही लोकशाहीची कणा असल्याचे सांगत, प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याची भूमिका अत्यंत जबाबदारीची असल्याचे स्पष्ट केले. मतदानाच्या दिवशी केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांनी कोणत्या टप्प्यावर कोणती दक्षता घ्यावी, मतदारांशी सौजन्यपूर्ण व निष्पक्ष वर्तन कसे असावे, मतदान यंत्रे हाताळताना कोणते नियम पाळणे आवश्यक आहे, तसेच तांत्रिक अडचणी किंवा आपत्कालीन परिस्थितीत कोणती कार्यपद्धती राबवावी याबाबत सविस्तर व स्पष्ट मार्गदर्शन करण्यात आले. मतदान प्रक्रिया ही केवळ प्रशासकीय कामकाज नसून लोकशाही मूल्यांची अंमलबजावणी करणारी जबाबदारीची सेवा असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
या प्रशिक्षणासाठी एकूण १२६ केंद्राध्यक्ष तसेच मतदान केंद्र स्तरीय पहिला, दुसरा व तिसरा मतदान अधिकारी असे ३८३ अधिकारी उपस्थित होते. एकूण सुमारे ५०९ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाला उपस्थिती लावली. प्रशिक्षणादरम्यान प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिक सादरीकरण करण्यात आले, तर अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या शंका दूर करण्यासाठी प्रश्नोत्तर सत्रही घेण्यात आले, ज्यामुळे प्रशिक्षण अधिक परिणामकारक ठरले.
निवडणूक प्रशासनाकडून येत्या काळात पुढील टप्प्यातील प्रशिक्षण कार्यक्रमही राबविण्यात येणार असून, सर्व अधिकारी व कर्मचारी पूर्ण तयारीनिशी, शिस्तबद्ध व जबाबदारीने मतदान प्रक्रिया पार पाडतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. मतदान प्रक्रियेत कोणतीही चूक, गोंधळ किंवा निष्काळजीपणा होऊ नये यासाठी प्रत्येकाने आपली भूमिका प्रामाणिकपणे पार पाडावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
Comments
Post a Comment