केट्स पॉईंटवर हृदयद्रावक घटना; ३५० फूट खोल दरीत सापडला पाटणच्या मिसिंग १७ वर्षीय मुलाचा मृतदेह, सह्याद्री ट्रेकर्स महाबळेश्वर यांची धाडसी मोहीम यशस्वी


केट्स पॉईंटवर हृदयद्रावक घटना; ३५० फूट खोल दरीत सापडला पाटणच्या मिसिंग १७ वर्षीय मुलाचा मृतदेह, सह्याद्री ट्रेकर्स महाबळेश्वर यांची धाडसी मोहीम यशस्वी

महाबळेश्वर प्रतिनिधी –

महाबळेश्वर तालुक्यातील आवकाळी येथील प्रसिद्ध केट्स पॉईंट परिसरात घडलेल्या हृदयद्रावक घटनेत पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथून बेपत्ता झालेल्या १७ वर्षीय भगवतसिंह मदनसिंह सोळंकी या युवकाचा मृतदेह सुमारे ३५० फूट खोल दरीतून बाहेर काढण्यात आला. अत्यंत धोकादायक आणि दुर्गम अशा केट्स पॉईंट परिसरात ही शोधमोहीम सह्याद्री ट्रेकर्स महाबळेश्वर या स्वयंसेवी शोध व बचाव पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

२५ जानेवारी रोजी दुपारी ढेबेवाडी पोलीस ठाण्याकडून सह्याद्री ट्रेकर्स महाबळेश्वर यांना संपर्क साधण्यात आला होता. एका १७ वर्षीय मुलाचा मोबाईल लोकेशन केट्स पॉईंट व आवकाळी परिसरात दाखवत असून तो अद्याप सापडलेला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीस, ग्रामस्थ व नातेवाईकांकडून दिवसभर शोध घेऊनही युवकाचा ठावठिकाणा लागला नव्हता. त्यामुळे सह्याद्री ट्रेकर्सकडे मदतीची विनंती करण्यात आली. त्यानुसार टीम तत्काळ सज्ज झाली होती; मात्र नातेवाईकांकडून अधिक माहिती घेणे, वाहतूक कोंडी आणि रात्रीच्या वेळेस जंगल व दरीत शोध घेण्याचा धोका लक्षात घेता त्या दिवशी मोहीम तात्पुरती थांबवण्यात आली.

२६ जानेवारी रोजी सकाळी पुन्हा ढेबेवाडी पोलिसांचा फोन आला. युवक अद्याप सापडलेला नसून अधिकृत विनंती अर्ज प्राप्त होत असल्याने तातडीने शोधमोहीम सुरू करण्याची मागणी करण्यात आली. त्याच वेळी महाबळेश्वर पोलीस चौकीत रक्तदान शिबिर सुरू होते. संजय पारठे यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक जाधव, सुहास बैलकर, सर्जेराव कुटेकर, जितेंद्र कदम आणि किरण चव्हाण यांनी आपापली कामे बाजूला ठेवून तात्काळ केट्स पॉईंट परिसरात धाव घेतली.

केट्स पॉईंट परिसरात खोल दऱ्या, धबधबे आणि घनदाट जंगल असल्याने शोधमोहीम अत्यंत जोखमीची होती. धबधब्याच्या पुढील बाजूस दरीत वरून पाहताना सुहास बैलकर यांना संशयास्पद दृश्य दिसून आले. त्यानंतर गोलाकार पायवाट शोधत सर्जेराव कुटेकर आणि जितेंद्र कदम यांनी दरीच्या दिशेने उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला. किरण चव्हाण रोपसह घटनास्थळी पोहोचले. दीपक जाधव आणि किरण चव्हाण यांनी रोप सेट करून अत्यंत काळजीपूर्वक खाली उतरत मृतदेह प्लास्टिक व स्ट्रेचरच्या सहाय्याने सुरक्षितपणे वर काढला.

ही संपूर्ण शोधमोहीम सह्याद्री ट्रेकर्स महाबळेश्वरच्या अनुभव, जिद्द आणि उत्कृष्ट समन्वयामुळे यशस्वी ठरली. या कार्यात संजय पारठे यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक जाधव, सुहास बैलकर, सर्जेराव कुटेकर, जितेंद्र कदम, किरण चव्हाण यांच्यासह पोलीस पाटील, स्थानिक ग्रामस्थ तसेच बॅकअप टीम म्हणून महाबळेश्वर ट्रेकर्स प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम यांनी मोलाचे सहकार्य केले.

मृतदेह बाहेर काढल्यानंतर तो तात्काळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी रुग्णवाहिकेतून पाठवण्यात आला. मृत युवकाचे नाव भगवतसिंह मदनसिंह सोळंकी (वय १७), रा. ढेबेवाडी, ता. पाटण असे आहे. केट्स पॉईंटसारख्या पर्यटनस्थळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अत्यंत धोकादायक परिस्थितीत मानवी कर्तव्य म्हणून मदतीला धावून गेलेल्या सह्याद्री ट्रेकर्स महाबळेश्वरच्या संपूर्ण पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl