महाबळेश्वरमध्ये इनरव्हील व रोटरी क्लबतर्फे पत्रकार दिन उत्साहात साजरा; पत्रकारांचा सन्मान
महाबळेश्वरमध्ये इनरव्हील व रोटरी क्लबतर्फे पत्रकार दिन उत्साहात साजरा; पत्रकारांचा सन्मान
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर इनरव्हील क्लब व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन मेटगुताड येथील आर्या हॉटेल येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महाबळेश्वर शहर व परिसरातील पत्रकारांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास महाबळेश्वर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित जाधव, ज्येष्ठ पत्रकार संजय दस्तुरे, विलास काळे, रमेश पल्लोड, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा वर्षा पार्टे, रोटरी क्लबचे अध्यक्ष विजय काळे, पीडीसी रोहिणी वैद्य, नगरसेविका विमलताई पार्टे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
पत्रकार दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित जाधव यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार संजय दस्तुरे, विलास काळे, रमेश पल्लोड तसेच अभिजित खुरासणे, प्रेषित गांधी, अजित कुंभारदरे, रियाज मुजावर, जितेंद्र कारंडे, शरद झावरे, संदीप देवकुळे, मिलिंद काळे, संदेश भिसे, राजेश सोंडकर, शानपरवेज डांगे आदी पत्रकारांचा क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा वर्षा पार्टे यांनी आपल्या मनोगतात पत्रकार दिन हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून समाजाचा आरसा असलेल्या पत्रकारितेचा सन्मान करण्याचा दिवस असल्याचे सांगितले. क्लबमार्फत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांच्या बातम्या पत्रकार सकारात्मकतेने व जबाबदारीने समाजापर्यंत पोहोचवतात, त्यामुळे केवळ प्रसिद्धी मिळत नाही तर कार्याचा उत्साह अनेकपटींनी वाढतो, असे त्यांनी नमूद केले. पत्रकारांच्या सहकार्यामुळे सामाजिक कार्य अधिक जोमाने व व्यापक स्वरूपात करण्याची प्रेरणा मिळते, अशी कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली.
रोटरी क्लबचे अध्यक्ष विजय काळे यांनी समाजाप्रती बांधिलकी जपत २४x७ पत्रकार करत असलेले कार्य मोलाचे असून समाजासाठी ते प्रेरणादायी असल्याचे सांगत पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ पत्रकार विलास काळे यांनी पत्रकारितेतील चांगले-वाईट अनुभव आणि बातम्या देताना येणाऱ्या कटू-गोड प्रसंगांवर मनोगत व्यक्त केले.
ज्येष्ठ पत्रकार संजय दस्तुरे यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ या नावाने पहिले मराठी वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाया घातल्याची माहिती दिली. ‘दर्पण’ म्हणजे समाजाची सद्यःस्थिती दाखवणारा आरसा असून झोपलेल्या समाजाला जागे करणे हाच त्यामागील हेतू होता, असे सांगून त्यांनी दर्पणकारांच्या कार्याची महती विशद केली. पत्रकारांना यथोचित सन्मान दिल्याबद्दल त्यांनी सर्व पत्रकारांच्या वतीने आयोजकांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता पल्लोड यांनी केले तर आभार प्रदर्शन दिनेश भिसे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी व इनरव्हील क्लबच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment