माहेरच्या लेकीचा ऐतिहासिक विजय; महाबळेश्वरात संत रोहिदास चर्मकार समाजाचा भावनिक सत्कार

माहेरच्या लेकीचा ऐतिहासिक विजय; महाबळेश्वरात संत रोहिदास चर्मकार समाजाचा भावनिक सत्कार

महाबळेश्वर प्रतिनिधी :

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १८३ मधून दणदणीत विजय मिळवत सामाजिक व राजकीय इतिहासात नवा अध्याय लिहिणाऱ्या नगरसेविका सौ. आशा दीपक काळे यांचा महाबळेश्वर येथे संत रोहिदास चर्मकार समाजाच्या वतीने भव्य, उत्साहपूर्ण आणि भावनिक सत्कार सोहळा पार पडला. “माहेरच्या लेकीचा विजय” या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला समाजबांधव, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली.

मुंबईतील अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून सौ. आशा काळे यांनी माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या वहिनी वैशाली नवीन शेवाळे यांचा अवघ्या १४५० मतांनी पराभव करत विजय मिळवला. मोठ्या राजकीय ताकदीविरुद्ध मिळवलेला हा विजय काँग्रेस पक्षाच्या संघटनशक्तीचा, कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांचा आणि समाजाच्या एकजुटीचा विजय मानला जात आहे. या निकालामुळे मुंबईच्या राजकारणातही नव्या चर्चांना उधाण आले आहे.

या यशामागे सौ. आशा काळे यांचे पती व माजी नगरसेवक दीपक काळे यांचे मोलाचे योगदान लाभले. सलग दहा वर्षे नगरसेवक म्हणून त्यांनी जनतेशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले होते. त्यांचा अनुभव, जनसंपर्क आणि मार्गदर्शन या निवडणुकीत निर्णायक ठरल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. तसेच खासदार वर्षा गायकवाड यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून पदयात्रा, बैठका आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत प्रचारासाठी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.

मूळच्या महाबळेश्वरच्या असलेल्या सौ. आशा काळे यांचे माहेरघर येथेच असल्याने या सत्काराला विशेष भावनिक संदर्भ लाभला. श्री शंकर–पार्वती मंदिरात आयोजित कार्यक्रमात चर्मकार ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश आप्पा साळुंखे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष मधुकर साळुंखे, समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक परशुराम काळे, गणेश काळे, रणजित तांबे, संत रोहिदास पथारी संघटनेचे अध्यक्ष संजय साळुंखे, चंद्रकांत कदम, रमेश कदम, जयवंत साळुंखे, उमेश साळुंखे, रवींद्र काळे, पंकज कदम, भारत साळुंखे, निलेश कदम, अशोक काळे, कमलेश कदम, ज्येष्ठ पत्रकार विलास बापू काळे व पत्रकार मिलिंद काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी सांगितले की, मुंबईसारख्या महानगरात चर्मकार समाजातील महिला नगरसेविका काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निवडून येणे ही समाजासाठी अभिमानाची बाब आहे. हा विजय समाजातील तरुण, महिला आणि सर्वसामान्य घटकांना राजकीय प्रवाहात सक्रिय होण्यासाठी नवी प्रेरणा देणारा आहे.

सत्काराला उत्तर देताना सौ. आशा दीपक काळे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, हा विजय वैयक्तिक नसून काँग्रेस पक्ष, पती दीपक काळे, खासदार वर्षा गायकवाड, आमदार ज्योती गायकवाड, पक्षाचे कार्यकर्ते आणि माहेरच्या संस्कारांचा आहे. मुंबईत काम करताना महाबळेश्वरचे नाव अभिमानाने पुढे नेईन तसेच सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव कटिबद्ध राहीन, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी पत्रकार मिलिंद काळे यांनी आपल्या मनोगतातून सौ. आशा दीपक काळे यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या व्हाव्यात अशा मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन रणजित तांबे यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले. एकूणच हा सत्कार सोहळा काँग्रेस पक्षाच्या संघटनबळाचा, महिलांच्या नेतृत्वाचा आणि समाजाच्या एकात्मतेचा गौरव करणारा ठरला असून महाबळेश्वरच्या भूमीतून उभा राहिलेला हा क्षण समाजाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणार आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl