महाबळेश्वर तालुक्यात कुंभरोशी गणात राष्ट्रवादीचा शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज; सचिन उतेकर यांचा भव्य रॅलीद्वारे अर्ज दाखल
महाबळेश्वर तालुक्यात कुंभरोशी गणात राष्ट्रवादीचा शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज; सचिन उतेकर यांचा भव्य रॅलीद्वारे अर्ज दाखल
कुंभारोशी प्रतिनिधी –
महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी गणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार असलेल्या सचिन श्रीरंग उतेकर यांनी आज जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महाबळेश्वर येथून भव्य रॅली काढत समर्थक, कार्यकर्ते आणि मतदारांसह त्यांनी तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मस्के यांच्याकडे अधिकृतपणे उमेदवारी अर्ज सादर केला. या रॅलीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रसंगी कुंभरोशी गणातील प्रत्येक गावातून शेतकरी, युवक, महिला, व्यापारी तसेच ज्येष्ठ नागरिक अशा सर्व स्तरांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘विकास, पारदर्शकता आणि सर्वसमावेशक नेतृत्व’ या मुद्द्यांवर भर देत सचिन उतेकर यांनी मतदारांशी संवाद साधला. स्थानिक प्रश्नांची जाण, सामाजिक कार्यातील सक्रिय सहभाग आणि उद्योग क्षेत्रातील अनुभव यांच्या जोरावर कुंभरोशी गणात विकासाचा नवा अध्याय सुरू करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत उतेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. कुंभरोशी गणात परिवर्तनाची गरज असून सचिन उतेकर निवडून येतील, असा ठाम विश्वास कार्यकर्ते व समर्थकांनी व्यक्त केला. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून आगामी निवडणुकीत कुंभरोशी गणात रंगतदार लढत पाहायला मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
Comments
Post a Comment