आरफळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संक्रांतीनिमित्त ‘प्लास्टिकमुक्त बाल बाजार’ — विद्यार्थ्यांच्या उपक्रमातून सुमारे वीस हजार रुपयांची उलाढाल, पर्यावरणाचा ठोस संदेश
आरफळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संक्रांतीनिमित्त ‘प्लास्टिकमुक्त बाल बाजार’ — विद्यार्थ्यांच्या उपक्रमातून सुमारे वीस हजार रुपयांची उलाढाल, पर्यावरणाचा ठोस संदेश
सातारा प्रतिनिधी –
सातारा तालुक्यातील आरफळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शनिवार, दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर ‘बाल बाजार’ हा उपक्रम सकाळी ९ ते १२ या वेळेत उत्साहात पार पडला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतः घरून तयार करून आणलेले वडापाव, भजीपाव, लाडू, शंकरपाळी, चिवडा, घरची बिस्किटे, साखरफुटाणे, चणे आदी खाद्यपदार्थ विक्रीस ठेवले होते. यासोबतच गाजर, वांगी, फ्लॉवर, मुळा, काकडी, टोमॅटो, कांदे, बटाटे, लिंबू, मेथी, पालक, केळी, पपई अशा विविध भाज्या व फळांचे स्टॉल विद्यार्थ्यांनी आकर्षक पद्धतीने मांडले होते.
संक्रांतीसाठी आवश्यक असणाऱ्या खास साहित्यामध्ये गाजर, हिरवे वाटाणे, भेंडी, शेवग्याच्या शेंगा, तीळ, गूळ, तिळगुळाचे लाडू, चिक्की, शेंगदाणे, हरभरा डाळ, काजू, बदाम, सुपारी, सुकं खोबरं, तिळगुळाचे छोटे पुडे, साखरफुटाण्याचे पुडे, चॉकलेट पुडे तसेच अंडी व खारदाणे यांचीही विक्री करण्यात आली. याशिवाय केसपिन, रबर, क्लिप, टिकल्या, मेहंदी, पावडर अशा दैनंदिन वापरातील लहान वस्तूंचे स्टॉलही बाल बाजाराचे आकर्षण ठरले.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण बाजार ‘प्लास्टिकमुक्त’ ठेवण्यात आला. शाळेमार्फत आधीच विद्यार्थ्यांना, पालकांना व नागरिकांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करता कापडी पिशव्या आणण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत नागरिकांनी कापडी पिशव्यांचा वापर करून खरेदी केली. त्यामुळे या बाल बाजारातून पर्यावरण संरक्षणाचा ठोस आणि प्रभावी संदेश देण्यात आला.
या बाल बाजाराला गावातील नागरिकांसह अंगणवाडीतील लहान मुलांनीही मोठ्या संख्येने भेट दिली आणि काही अंगणवाडीतील विद्यार्थी सहभागी झाले. या उपक्रमातून सुमारे २० हजार रुपयांची उलाढाल झाली. विद्यार्थ्यांनी स्वतः ग्राहकांशी संवाद साधत व्यवहार केल्याने पालक व ग्रामस्थांनी त्यांच्या उपक्रमशीलतेचे, आत्मविश्वासाचे आणि व्यवहारज्ञानाचे कौतुक केले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना संवाद कौशल्य, गणनक्रिया, व्यवहारज्ञान, वजन व मोजमाप, संघभावना आणि आत्मविश्वास अशा अनेक जीवनोपयोगी कौशल्यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर एकाच ठिकाणी भाजीपाला व सणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध झाल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
या उपक्रमासाठी शिक्षक महादेव यादव व लीना पोटे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सर्वांच्या सहकार्यामुळे ‘प्लास्टिकमुक्त बाल बाजार’ उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला असून सहभागी सर्व विद्यार्थी, पालक व सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले.
Comments
Post a Comment