केळघर घाटात ट्रकचा भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, सहयाद्री ॲडव्हेंचर ट्रेकर्स व ग्रामस्थांच्या धाडसी मदतकार्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यात यश

केळघर घाटात ट्रकचा भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, सहयाद्री ॲडव्हेंचर ट्रेकर्स व ग्रामस्थांच्या धाडसी मदतकार्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यात यश

महाबळेश्वर प्रतिनिधी –

महाबळेश्वर–सातारा मार्गावरील केळघर घाटात मंगळवार दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडून ट्रक चालकाचा मृत्यू झाला. मेढा पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 20/2026 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 106, 281 तसेच मोटार वाहन अधिनियम कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात ट्रक चालक आजीनाथ मारूती नागरगोजे वय 33 वर्षे, सध्या रा. किनी वाठार ता. हातकणंगले जि. कोल्हापूर, मूळ रा. येवलवाडी ता. पाटोदा जि. बीड यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

याबाबत फिर्यादी आदित्य ज्ञानेश्वर जाधव वय 25 वर्षे, व्यवसाय ट्रक मालक, रा. किनी वाठार ता. हातकणंगले जि. कोल्हापूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी रात्री सुमारे 2.30 वाजता मौजे मुकवली ता. जावली गावच्या हद्दीतील महाबळेश्वर ते सातारा जाणाऱ्या केळघर घाटातील रस्त्यावर मातोश्री हॉटेलपासून सुमारे 50 मीटर अंतरावर टाटा कंपनीचा केशरी रंगाचा ट्रक क्रमांक KA-28-C-5568 हा रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकार व निष्काळजीपणे चालवण्यात आला. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रकचा भीषण अपघात झाला. ट्रकमध्ये चुना, खडी, ॲसिड रॉ मटेरियलसारखा जड माल भरलेला होता. अपघातानंतर ट्रकमधील मोठमोठ्या पोत्यांनी कॅबिन फोडून पुढे घुसखोरी केल्याने चालक केबिनमध्ये अडकला आणि गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.

सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या दरम्यान सर्जेराव खुटेकर यांना अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने महाबळेश्वर व मेढा पोलीस ठाण्यांना कळवले तसेच स्थानिक मदतगटांना संदेश पाठवला. सहयाद्री ॲडव्हेंचर ट्रेकर्सचे सदस्य, संजय पारठे सर, दिपक जाधव, सुनील खुरेकर, जितू कदम, सुहास बेलकर तसेच रेंगडी व परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. ट्रकमधील सुमारे हजार किलो वजनाची पोती कॅबिनवर कोसळल्याने क्रेनशिवाय मदतकार्य अवघड होते, मात्र स्थानिकांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने पोती हटवण्याचे काम सुरू केले.

प्रथम संपूर्ण वाहनाची तपासणी करून खाली शोधमोहीम राबवण्यात आली. या दरम्यान अडकलेल्या चालकाचा हात दिसून आल्यानंतर बचावकार्याला गती देण्यात आली. फुटलेली पोती पावड्यांच्या सहाय्याने बाजूला ओढण्यात आली. नंतर ट्रॅक्टर, डंपर व अखेर जेसीबीच्या मदतीने कॅबिन मागील बाजूने उचलण्यात आली. चालक स्टेअरिंगमध्ये अडकलेला असल्याने अत्यंत काळजीपूर्वक त्याला बाहेर काढण्यात आले. सर्जेराव खुटेकर, जितू कदम, सुनील खुरेकर व संजय पारठे सर यांनी एकत्रितपणे मृतदेह बाहेर काढून ग्रामस्थांच्या मदतीने स्ट्रेचरवर ठेवला व पोलिसांच्या ताब्यात दिला. त्यानंतर रुग्णवाहिकेतून पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह रवाना करण्यात आला.

या दुर्घटनेनंतर तपास अधिकारी GPSI गंगावणे यांनी घटनास्थळी पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे. भीषण परिस्थितीतही प्रसंगावधान राखत धाडसी मदतकार्य करणाऱ्या सहयाद्री ॲडव्हेंचर ट्रेकर्सचे सदस्य व ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्या तत्परतेमुळे मृतदेह बाहेर काढणे शक्य झाले.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl