वारसोळी देव येथे सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ; ज्ञानेश्वरी पारायणातून संतपरंपरेचा भक्तीमय जागर
वारसोळी देव येथे सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ; ज्ञानेश्वरी पारायणातून संतपरंपरेचा भक्तीमय जागर
संतोष मालुसरे,
तापोळा प्रतिनिधी –
महाबळेश्वर तालुक्यातील मौजे वारसोळी देव (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) येथे श्री वाघजाई महाकाली विठ्ठल रखुमाई मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या सामुदायिक पारायणाचा भव्य आध्यात्मिक सोहळा माघ शुद्ध प्रतिपदा सोमवार दि. १९ जानेवारी २०२६ पासून सुरू होत असून रथसप्तमी रविवार दि. २५ जानेवारी २०२६ रोजी त्याची सांगता होणार आहे. यंदा या सप्ताहाचे ५० वे वर्ष असून सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून हा सोहळा मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा होत आहे.
रथसप्तमीचा पवित्र योग, श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे ७५० वे जन्मोत्सवी वर्ष, श्री संत नामदेव महाराजांचा ६७५ वा समाधी सोहळा वर्ष तसेच श्री संत तुकाराम महाराजांचा ३७५ वा वैकुंठगमन सोहळा वर्ष या पावन निमित्ताने या सप्ताहाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. श्री पांडुरंगाच्या कृपेने कै. मा. आ. जी. जी. कदम (आण्णा), वै. ह. भ. प. हरिभाऊ गुरुजी (निपाणी), वै. भिकू (बुवा) देशमुख (गांजे) व कै. जगन्नाथ नलावडे गुरुजी (वेटणे) यांच्या आशीर्वादाने तसेच व्यासपीठ चालक ह. भ. प. बाळकृष्ण महाराज निपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ मंडळ, मुंबईकर मंडळ व महिला मंडळ वारसोळी देव यांच्या सहकार्याने हा सोहळा संपन्न होत आहे.
सोमवार दि. १९ जानेवारी रोजी ग्रंथपूजन, ध्वजारोहण, दीपप्रज्वलन व वीणापूजनाने कार्यक्रमाचा शुभारंभ होणार असून संपूर्ण सप्ताहात पहाटे काकड आरतीपासून रात्री हरिजागरापर्यंत अखंड नामस्मरण चालणार आहे. विष्णूसहस्त्रनाम, श्री ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण, गाथा भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन तसेच संतपंगती अशा विविध धार्मिक व आध्यात्मिक उपक्रमांमुळे संपूर्ण वारसोळी देव परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघणार आहे. या सप्ताहात ह. भ. प. बाळकृष्ण महाराज शिंदे (निपाणी), ह. भ. प. आनंद महाराज कदम (आपटी) व ह. भ. प. के. एन. मोरे (वारसोळी देव) हे व्यासपीठ चालक म्हणून सेवा देणार असून नामवंत कीर्तनकार, भजनकार, मृदंगाचार्य व गायनाचार्य यांची उपस्थिती लाभणार आहे. ग्रामस्थांचा व भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग या सप्ताहाचे वैशिष्ट्य ठरणार आहे.
सुवर्ण महोत्सवी सप्ताहाच्या निमित्ताने राज्यातील व देशातील अनेक मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे, मदत व पुनर्वसन मंत्री मा. ना. मकरंदआबा पाटील, राज्यसभा खासदार नितीनकाका पाटील, सातारा लोकसभा खासदार छ. उदयनराजे भोसले, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस (श. पवार) गटाचे अध्यक्ष मा. आ. शशिकांत शिंदे, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील तसेच माजी आमदार दगडूदादा सपकाळ यांच्या उपस्थितीने या सोहळ्याची शोभा वाढणार आहे.
या आध्यात्मिक पर्वानंतर श्री वाघजाई महाकाली देवीची वार्षिक यात्रा शनिवार दि. ३१ जानेवारी ते रविवार दि. १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वारसोळी देव परिसर पूर्णतः भक्तिमय वातावरणाने भारावून जाणार असून सर्व भाविक भक्तांनी या दुर्मीळ आध्यात्मिक संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ वारसोळी देव (मुंबई) यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment