अजितदादांच्या आठवणीने सभेत भावनांचा बांध फुटला; काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच संधी देण्याचे राजू शेठ राजपुरे यांचे ठाम आवाहन
अजितदादांच्या आठवणीने सभेत भावनांचा बांध फुटला; काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच संधी देण्याचे राजू शेठ राजपुरे यांचे ठाम आवाहन
कुंभरोशी प्रतिनिधी :
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला वेग आला असून कुंभरोशी येथे पार पडलेल्या प्रचार सभेत जिल्हा बँकेचे संचालक राजू शेठ राजपुरे यांनी परखड आणि भावनिक भाषण करत उपस्थितांना विचार करायला भाग पाडले. कुंभरोशी गणाचे उमेदवार सचिन उतेकर आणि तळदेव गटाचे उमेदवार संजय गायकवाड यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी बोलताना राजू शेठ राजपुरे यांनी मागील निवडणुकीत निवडून दिलेल्या जिल्हा परिषद सदस्याने पाच वर्षांत गावाला किती वेळा भेट दिली, गावासाठी नेमके काय काम केले, याचा हिशेब आता जनतेनेच घ्यायला हवा, असे ठामपणे सांगितले. निवडणुकीच्या काळातच गावात येणाऱ्या आणि मतं घेतल्यानंतर दिसेनाशा होणाऱ्या नेत्यांना पुन्हा पुन्हा संधी देण्याची सवय आपण बदलली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजपुरे म्हणाले की, अनेकदा आपण फक्त घोषणा करणाऱ्यांना डोक्यावर घेतो आणि प्रत्यक्षात गावागावात, लोकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन सातत्याने काम करणाऱ्या राष्ट्रवादीसारख्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करतो. मागील पाच वर्षांत आपण ज्या पक्षाला सत्ता दिली, त्या पक्षाने आपल्या परिसरात काय बदल घडवून आणला, याचा शांतपणे विचार केला तर खरे काम कोण करत आहे, हे सहज लक्षात येईल, असे मत त्यांनी मांडले.
स्वर्गीय बाळासाहेब भिलारे यांच्या विचारांचा उल्लेख करताना राजपुरे यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करताना कधीही पदाचा लोभ धरला नाही. आज तुम्ही मला जिल्हा परिषदेसाठी उभे राहायला सांगत असाल, पण मी उभा राहिलो किंवा संजूबाबा उभे राहिले, यात काहीही फरक नाही. आपला हेतू एकच आहे आणि तो म्हणजे सर्वसामान्य जनतेचा विकास. व्यक्तीपेक्षा विचार आणि काम महत्त्वाचे आहे, असे त्यांनी ठासून सांगितले.
कुंभरोशी गणाचे उमेदवार सचिन उतेकर यांचा उल्लेख करताना राजपुरे यांनी सांगितले की, कोणतेही पद नसतानाही सचिन उतेकर यांनी आपल्या विभागात सातत्याने आणि प्रामाणिकपणे काम केले आहे. लोकांच्या अडचणींमध्ये ते कायम पुढे राहिले आहेत. अशा धडाडीच्या कार्यकर्त्याला नाकारणे योग्य ठरणार नाही. सचिन उतेकर हे प्रत्येकाच्या घरातलेच कार्यकर्ते असून त्यांना निवडून देणे हे आपले कर्तव्य आहे, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
तळदेव गटातील उमेदवार संजय गायकवाड उर्फ संजूबाबा यांच्याबाबत बोलताना राजपुरे म्हणाले की, संजूबाबा हे निर्भीड, ताकतवर आणि काम करण्याची क्षमता असलेले उमेदवार आहेत. ते निवडून आले, तर तो विजय माझाच असल्यासारखा असेल. मागील वेळेसारखे केवळ नावापुरते उमेदवार आता चालणार नाहीत. निवडणुकीपुरते अचानक उगवणारे नेते गावाच्या उपयोगाचे नसतात, अशी जोरदार टीकाही त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, भाषणाच्या मध्यात उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांची आठवण काढताच राजू शेठ राजपुरे भावूक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले. काही काळ संपूर्ण सभेत शांतता पसरली. अजितदादांनी महाबळेश्वर तालुक्यासाठी केलेले विकासकाम, शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेसाठी घेतलेली ठाम भूमिका आणि जनतेशी असलेली नाळ याची आठवण यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. हा भावनिक क्षण पाहून कार्यकर्ते आणि ग्रामस्थही भारावून गेले.
या प्रचार सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेच्या माध्यमातून जनतेमध्ये राहून काम करणाऱ्या, प्रश्न समजून घेणाऱ्या आणि विकासासाठी सातत्याने झटणाऱ्या उमेदवारांनाच यावेळी संधी द्यावी, असा ठाम संदेश देण्यात आला.
Comments
Post a Comment