महाबळेश्वरचे ग्रामदैवत श्री जननी माता (म्हमा देवी) यात्रा १९ रोजी; तीन दिवस भक्तिमय उत्सवाचे आयोजन


महाबळेश्वरचे ग्रामदैवत श्री जननी माता (म्हमा देवी) यात्रा १९ रोजी; तीन दिवस भक्तिमय उत्सवाचे आयोजन

महाबळेश्वर प्रतिनिधी  :-

महाबळेश्वरचे ग्रामदैवत श्री जननी माता (म्हमा देवी) यांची सालाबादप्रमाणे यंदाही यात्रा दि. १९ जानेवारी रोजी भक्तीभावाने आणि उत्साहात साजरी होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेनिमित्त संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार असून पंचक्रोशीतील भाविकांची मोठी उपस्थिती अपेक्षित आहे. यात्रेच्या निमित्ताने विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उत्सव समितीने दिली आहे.

उत्सवाची सुरुवात रविवार दि. १८ जानेवारी रोजी होणार असून पहिल्या दिवशी श्री जननी मातेच्या पालखीची ग्रामप्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भव्य मिरवणुकीत पालखी शहरातून मार्गस्थ होणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सोमवार दि. १९ जानेवारी रोजी पहाटे साडेपाच वाजता श्री जननी माता व भैरवनाथ यांचा अकरा आवर्तनांचा रुद्राभिषेक होणार आहे. सकाळी सात वाजता पवित्र मंत्रोच्चारात रणचंडिका अग्नीहोम पार पडणार असून साडेअकरा वाजता महाआरती होईल. दुपारी बारा वाजता सुवासिनींसाठी हळदीकुंकू व ओटी भरण्याचा पारंपरिक कार्यक्रम होणार असून दुपारी एक वाजता महाप्रसादाला सुरुवात होईल. या महाप्रसादाचा लाभ सर्व भाविकांना दिला जाणार आहे. याच दिवशी स्थानिक पंचक्रोशीतील सांप्रदायिक सुस्वर भजनांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

सोमवारी रात्री ८ वाजल्यापासून पहाटे ३ वाजेपर्यंत आई जननी व भैरवनाथाचा गोंधळ व जागरणाचा कार्यक्रम होणार आहे. या जागरणात देवीच्या गोंधळातील पारंपरिक कला, वासुदेव–पोतराज, गवळण तसेच भक्तिगीतांचा समावेश असणार असून रात्रभर भक्तीमय वातावरण अनुभवायला मिळणार आहे.

मंगळवार दि. २० जानेवारी रोजी उत्सवाच्या तिसऱ्या व अंतिम दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भाविकांच्या मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ६ वाजता महाआरती पार पडेल. त्यानंतर यात्रेची श्रीफळ वाढवून उत्तरपूजा करण्यात येईल व पारंपरिक रीतिरिवाजांनुसार या तीन दिवसीय यात्रेची सांगता होणार आहे.

गावकऱ्यांसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री जननी माता व भैरवनाथाच्या कृपेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिराचे पुजारी अनिल लोहार आणि यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl