महाबळेश्वर तालुक्यात आज राजकीय भूकंप?
महाबळेश्वर तालुक्यात आज राजकीय भूकंप? राष्ट्रवादीतील नाराजी, भाजपच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष
महाबळेश्वर प्रतिनिधी –
महाबळेश्वर तालुक्याच्या राजकारणात आज मोठा उलथापालथीचा दिवस ठरणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाबळेश्वर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता अबाधित राहिली असून स्वर्गीय बाळासाहेब भिलारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने तालुक्यात मजबूत पकड निर्माण केली होती. प्रशासन असो वा राजकीय निर्णय, बाळासाहेब भिलारे यांच्या शब्दाला मोठे वजन होते आणि त्यांच्यामार्फत राष्ट्रवादीने सत्ता कायम राखली होती.
मात्र यंदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर झालेल्या उमेदवारीमुळे पक्षांतर्गत असंतोष उफाळून आला आहे. अनेक इच्छुक आणि जुने निष्ठावंत कार्यकर्ते तसेच नेते उमेदवारीपासून वंचित राहिल्याने नाराज असल्याचे चित्र आहे. ही नाराजी उघडपणे व्यक्त होत असून हे नाराज नेते नेमका कोणता निर्णय घेतात, याकडे संपूर्ण महाबळेश्वर तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपकडून ही संधी साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. आज वाई येथे होणाऱ्या भाजपच्या महत्त्वाच्या बैठकीकडे तालुक्यातील राजकीय जाणकारांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. या बैठकीत महाबळेश्वर तालुक्यातील काही प्रमुख राष्ट्रवादी नेते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. विशेषतः उमेदवारीमुळे नाराज झालेले नेते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
जर हे अंदाज खरे ठरले, तर महाबळेश्वरच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक वर्षांची राष्ट्रवादीची पकड सैल होऊन भाजपला तालुक्यात बळकटी मिळू शकते. त्यामुळे आजची घडामोड महाबळेश्वर तालुक्याच्या राजकीय दिशेला नवे वळण देणारी ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आता नेमके कोण कोण भाजपमध्ये प्रवेश करतात आणि या घडामोडींमुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे कशी बदलतात, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
Comments
Post a Comment