कठोर परिश्रमांची फळे; महाबळेश्वरच्या विजय तोडकर यांचे भारतीय थल सेनेत अग्निवीर म्हणून स्वप्नपूर्ती
कठोर परिश्रमांची फळे; महाबळेश्वरच्या विजय तोडकर यांचे भारतीय थल सेनेत अग्निवीर म्हणून स्वप्नपूर्ती
मिलिंद काळे,
महाबळेश्वर प्रतिनिधी –
महाबळेश्वर येथील जिजामाता हौसिंग सोसायटीत राहणारे विजय संतोष तोडकर यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर भारतीय थल सेनेत अग्निवीर म्हणून निवड होऊन आपल्या कुटुंबासह संपूर्ण महाबळेश्वर परिसराचा अभिमान वाढवला आहे. साध्या कुटुंबातून आलेल्या विजय यांनी कोणत्याही मोठ्या आधाराशिवाय, स्वतःच्या हिमतीवर हे यश मिळवून दाखवले आहे.
लहानपणापासूनच देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगलेल्या विजय यांनी परिस्थितीशी झुंज देत आपले ध्येय स्पष्ट ठेवले. मर्यादित आर्थिक परिस्थिती असूनही त्यांनी कधीही हार मानली नाही. त्यांच्या यशामागे कुटुंबीयांचे मोलाचे योगदान आहे. आई शिवणकाम करून कुटुंबाला हातभार लावते, तर वडील नोकरी करून मुलांच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी सातत्याने मेहनत घेत राहिले. घरातील जबाबदाऱ्या, आर्थिक अडचणी आणि कठीण परिस्थिती असतानाही विजय यांनी शारीरिक मेहनत, नियमित सराव आणि मानसिक तयारीत कधीही तडजोड केली नाही.
भारतीय थल सेनेत सेवा करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी सातत्याने मेहनत घेतली. रोजचा कठोर सराव, शिस्तबद्ध जीवनशैली आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर अखेर त्यांची अग्निवीर म्हणून निवड झाली. हा क्षण केवळ विजय यांच्यासाठीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबासाठी आणि संपूर्ण परिसरासाठी अभिमानाचा ठरला आहे.
विजय तोडकर यांच्या या यशामुळे परिसरातील अनेक तरुणांना नवी दिशा आणि प्रेरणा मिळाली आहे. स्वतःच्या कष्टांवर विश्वास ठेवला तर कोणतेही स्वप्न साकार होऊ शकते, हे त्यांनी आपल्या यशातून दाखवून दिले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिजामाता मित्र मंडळ, जिजामाता हौसिंग सोसायटीतील नागरिक तसेच नवनाथ बाळकृष्ण डोईफोडे यांच्यासह अनेक शुभेच्छुकांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.
विजय तोडकर यांची ही यशोगाथा महाबळेश्वरच्या युवकांसाठी नवी ऊर्जा देणारी असून देशसेवेच्या मार्गावर जाण्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
Comments
Post a Comment