कुंभरोशी गणात पंचरंगी लढत निश्चित; पंचायत समिती निवडणुकीत अपक्षांसह प्रमुख पक्ष आमनेसामने
कुंभरोशी गणात पंचरंगी लढत निश्चित; पंचायत समिती निवडणुकीत अपक्षांसह प्रमुख पक्ष आमनेसामने
महाबळेश्वर प्रतिनिधी –
महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी गण पंचायत समिती निवडणुकीत अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले असून येथे पंचरंगी लढत निश्चित झाली आहे. कुंभरोशी गणातून पंचायत समितीसाठी एकूण सात उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. मात्र अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी संजय रामचंद्र गायकवाड आणि धोंडीबा रामचंद्र धनावडे यांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने निवडणूक रिंगणात पाच उमेदवार कायम राहिले आहेत.
अर्ज माघारीनंतर कुंभरोशी गणातून सचिन श्रीरंग उतेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून, सुरेश हरिभाऊ जाधव हे भारतीय जनता पक्षाकडून, संजय हरिश्चंद्र मोरे हे शिवसेनेकडून, तर समीर मधुकर चव्हाण आणि सनी अशोक मोरे हे दोघेही अपक्ष म्हणून निवडणूक मैदानात उतरले आहेत. प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार आणि दोन अपक्ष उमेदवार आमनेसामने आल्याने ही निवडणूक अधिकच चुरशीची आणि अनिश्चिततेची ठरणार असल्याचे चित्र आहे.
महाबळेश्वर तालुक्यात आधीच पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना कुंभरोशी गणातील पंचरंगी लढतीमुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्थानिक प्रश्न, ग्रामविकास, मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, रोजगार आणि पर्यटनाशी संबंधित मुद्दे प्रचारात महत्त्वाचे ठरणार असून सर्व उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जोमाने तयारी करताना दिसत आहेत.
पाच उमेदवार रिंगणात असल्याने मतांचे विभाजन होण्याची शक्यता वाढली असून कोणाचा पारडा जड ठरणार याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. येत्या काही दिवसांत प्रचार अधिक तीव्र होणार असून कुंभरोशी गणातील ही पंचरंगी लढत महाबळेश्वर तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीतील एक महत्त्वाची आणि लक्षवेधी लढत ठरणार आहे.
Comments
Post a Comment