गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात स्नेहसंमेलनाचा बहुरंगी उत्सव

गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात स्नेहसंमेलनाचा बहुरंगी उत्सव

महाबळेश्वर प्रतिनिधी :

गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, महाबळेश्वर येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चे वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने, विविध शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांनी आणि पालकांच्या मोठ्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणणे, त्यांच्या अंगभूत कला, कौशल्ये व नेतृत्वगुणांना वाव देणे या उद्देशाने या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

स्नेहसंमेलनाची सुरुवात स्काऊट-गाईड मेळाव्याने करण्यात आली. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी सांघिक तंबू सजावटीतून शिस्त, संघभावना आणि सर्जनशीलतेचे प्रभावी दर्शन घडवले. विद्यार्थ्यांमधील स्वावलंबन आणि कौशल्यविकासाला चालना देण्यासाठी याच कालावधीत पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध पदार्थ सादर करत आपले कौशल्य दाखवले, तर स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

दिनांक ५ व ६ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कबड्डी, रस्सीखेच, १०० मीटर धावणे, दोरी उडी, रिले, गोळा फेक अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी आपली ताकद, चिकाटी आणि खेळाडूवृत्ती दाखवली. या क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, सहकार्य आणि आरोग्याबाबतची जाणीव अधिक दृढ झाली.

दिनांक ७ जानेवारी रोजी रांगोळी, चित्रकला, विज्ञान, कार्यानुभव, रिटेल आणि मल्टी-स्किल विषयांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाशी संबंधित नाविन्यपूर्ण, उपयुक्त आणि कौशल्याधारित प्रकल्प सादर केले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि प्रयोगशील वृत्तीचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

दिनांक ८ जानेवारी रोजी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांनी स्नेहसंमेलनाला विशेष रंगत आणली. पारंपरिक नृत्य, गीत, लोककला आणि महाराष्ट्राच्या लोकधारेवर आधारित सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

दिनांक ९ जानेवारी रोजी पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभास गिरिस्थान नगरपरिषदेचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील शिंदे, मुख्याधिकारी योगेश पाटील, नगरसेवक ॲड. संजय जंगम, रोहित ढेबे, संतोष आखाडे, विमल पार्टे, पल्लवी कोंढाळकर, प्रियांका वायदंडे, विमल बिरामणे, कामगार संघटनेचे ऋषिकेश वायदंडे, माजी विद्यार्थी शंकर ढेबे तसेच पत्रकार अभिजीत खुरासने आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे, शाळेतील उपक्रमांचे आणि शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करत भविष्यात नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रशालेसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासन दिले.

अनेक वर्षांच्या खंडानंतर यावर्षी प्रशालेचे प्राचार्य परमेश्वर रामचंद्र माने यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली स्नेहसंमेलनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या संपूर्ण उपक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी स्नेहभोजनाने स्नेहसंमेलनाची सांगता करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांचा सकारात्मक प्रतिसाद हेच या स्नेहसंमेलनाच्या यशाचे खरे प्रतीक ठरले.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl