महिला कर्मचाऱ्यांचे वेतन व पीएफ रोखले; महाबळेश्वर नगरपालिकेच्या असंवेदनशील कारभारावर संताप, आंदोलनाचा इशारा
महिला कर्मचाऱ्यांचे वेतन व पीएफ रोखले; महाबळेश्वर नगरपालिकेच्या असंवेदनशील कारभारावर संताप, आंदोलनाचा इशारा
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर नगरपालिकेतील महिला कर्मचाऱ्यांना सलग दोन महिन्यांपासून वेतन न मिळणे तसेच वेतनातून कपात करण्यात आलेला भविष्य निर्वाह निधी (पी.एफ.) संबंधित खात्यात जमा न केल्याचा गंभीर व धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे नगरपालिकेच्या आर्थिक व प्रशासकीय कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांनी प्रशासनाविरोधात थेट आक्रमक भूमिका घेतली आहे.
आरपीआयचे महाबळेश्वर शहराध्यक्ष श्री. विनय (भाऊ) गायकवाड यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या स्मरणपत्रात तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. महिला कर्मचाऱ्यांच्या मेहनतीच्या पैशांवर गदा आणणे हा केवळ निष्काळजीपणा नसून सरळसरळ कायद्याचे उल्लंघन असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. घरखर्च, मुलांचे शिक्षण, औषधोपचार यांसारख्या मूलभूत गरजांसाठी महिला कर्मचाऱ्यांना कर्ज काढावे लागत असल्याचे वास्तव प्रशासनाच्या संवेदनशून्यतेचे प्रतीक असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
वेतनातून कपात केलेला पी.एफ. निधी संबंधित खात्यात जमा न करणे हा गंभीर आर्थिक गुन्हा असून, यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, अशी ठाम मागणी आरपीआयने केली आहे. यापूर्वीही या प्रश्नावर आंदोलने करूनही प्रशासनाने केवळ ‘बघ्याची भूमिका’ घेतल्याचा आरोप करत, आता सबुरीचा अंत झाल्याचा इशाराही पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
जर तात्काळ थकीत वेतन आणि कपात केलेला पी.एफ. महिला कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला नाही, तर महिला कर्मचाऱ्यांसह महाबळेश्वर नगरपालिकेवर तीव्र आंदोलन, निदर्शने तसेच कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. या संघर्षात महिला कर्मचाऱ्यांच्या पाठीशी संपूर्ण ताकदीने उभे राहण्याची भूमिका आरपीआयने जाहीर केली आहे.
दरम्यान, महिला कर्मचाऱ्यांच्या हक्कांवर होणाऱ्या अन्यायाकडे नगरपालिकेचे लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी डोळेझाक करणार का, असा थेट सवाल आता नागरिकांमधूनही उपस्थित होत असून, प्रशासन या गंभीर प्रकरणावर नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment