जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू; महाबळेश्वर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग
जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू; महाबळेश्वर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग
✍️जितेंद्र कारंडे,
प्रतापगड प्रतिनिधी –
महाबळेश्वर तालुक्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी अंतर्गत तयारीला वेग दिला असून ग्रामीण राजकारण पुन्हा एकदा तापू लागले आहे. नगरपालिका निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून त्यानंतर महानगरपालिका निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाल्याने ग्रामीण भागात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. निवडणुकांची चाहूल लागताच तालुक्यातील दर्या खोऱ्यातील गावागावात बैठका, गाठीभेटी, सामाजिक कार्यक्रम, वाढदिवस, जत्रा आणि यात्रांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवण्याचे प्रयत्न जोर धरू लागले आहेत.
महाबळेश्वर–पाचगणी नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व ठामपणे सिद्ध केल्याने पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या यशाची पुनरावृत्ती जिल्हा परिषद व पंचायत समितीतही व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. पक्षांतर्गत बैठका, संभाव्य उमेदवारांची चाचपणी तसेच ग्रामपातळीवर संघटन मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. स्वर्गीय बाळासाहेब भिणारे यांच्या नेतृत्वाखाली पूर्वी तालुक्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वर्चस्व होते, मात्र सध्याची राजकीय परिस्थिती वेगळी असल्याचे चित्र दिसून येत आहे.
महाबळेश्वर तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी दोन तर पंचायत समितीसाठी चार सदस्य निवडून दिले जातात. यापूर्वी जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रत्येकी एक अशा जागांचे समीकरण होते, तर पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीकडे तीन आणि शिवसेनेकडे एक जागा होती. सध्याच्या आरक्षणानुसार भिलार गट जिल्हा परिषदेसाठी अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला असून तळदेव गट खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे. पंचायत समितीमध्ये भिलार गण खुल्या प्रवर्ग महिला, गुताळगड गण नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी महिला, तर तळदेव गण आणि कुंभरोशी गण खुल्या प्रवर्गातील पुरुषांसाठी आरक्षित झाले आहेत.
दरम्यान, तालुक्याचे राजकारण अधिक रंगतदार होताना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जन्मगाव महाबळेश्वर तालुक्यात असून त्यांच्या माध्यमातून तापोळा परिसरात झपाट्याने विकास झाल्याने शिवसेनेची ताकद वाढत असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे मंत्री मकरंद आबा पाटील यांनी राजेंद्र शेठ राजपुरे, जिल्हा बँक संचालक संजूबाबा गायकवाड माजी सभापती यांच्या माध्यमातून नगरपरिषद निवडणुकांत आपली ताकद सिद्ध केली आहे. भाजपमध्ये अलीकडेच झालेले पक्षप्रवेश लक्षात घेता भाजपही या निवडणुकीत आपली ताकद आजमावण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र आहे.
भिलार गटातील जिल्हा परिषद उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याचा चंग राष्ट्रवादीकडून बांधला जात असताना शिवसेना आणि भाजपदेखील सक्षम उमेदवार उभे करण्याच्या तयारीला लागले आहेत. ग्रामीण मतदारांचा कल, स्थानिक प्रश्न, विकासकामांचा आढावा आणि नेतृत्व या मुद्द्यांवर ही निवडणूक रंगणार असून आगामी काळात महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment