माखरिया गार्डनजवळ जांभळाच्या वृक्षाला आग; नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

 माखरिया गार्डनजवळ जांभळाच्या वृक्षाला आग; नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

महाबळेश्वर प्रतिनिधी :

महाबळेश्वर नगरपालिकेच्या हद्दीतील माखरिया गार्डन व ख्राईस्ट चर्चकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या एका मोठ्या जांभळाच्या झाडाच्या बुंध्याला कचरा जाळल्यामुळे आग लागल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. ही आग झाडाच्या बाहेरून नव्हे तर बुंध्याच्या आतून लागल्याने वृक्षाला मोठा धोका निर्माण झाला होता. मात्र स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि नगरपालिकेच्या तातडीच्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

या घटनेची माहिती सर्वप्रथम सूर्यकांत पंचाल यांनी दिली. रस्त्याच्या कडेला असलेला कचरा जाळताना निसर्ग कंटकांकडून झाडाच्या बुंध्यालगत आग लावण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आग आतून पसरत असल्याचे लक्षात येताच त्यांनी आपल्या परीने ती विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ओंकारजी नावीलकर यांनीही वृक्ष संरक्षणाबाबत जागरूकता दाखवत हा प्रकार तात्काळ संबंधितांकडे निदर्शनास आणून दिला.

या गैरप्रकाराची माहिती मिळताच महाबळेश्वर नगरपालिकेच्या वृक्ष अधिकारी व गस्तीवरील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. झाडाच्या बुंध्याला लागलेली आग पाण्याने विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तक्रारीची तत्काळ दखल घेतल्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले असून संबंधित जांभळाचा वृक्ष वाचवण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना सुरू करण्यात आली आहे.

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळण्याचे प्रकार सातत्याने घडत असून यामुळे पर्यावरणासह मौल्यवान वृक्षसंपदेला मोठा धोका निर्माण होत आहे. विशेषतः महाबळेश्वरसारख्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील पर्यटनस्थळी असे प्रकार गंभीर आहेत. नागरिकांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नगरपालिकेने अधिक प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, नगरपालिकेच्या तत्परतेमुळे आणि जागरूक नागरिकांच्या सहकार्यामुळे या घटनेत मोठी हानी टळली असली, तरी निसर्ग संवर्धनासाठी सर्वांनीच अधिक जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl