महाबळेश्वर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी सुनील शिंदे विराजमान ; खासदार नितीन काका पाटील यांच्या उपस्थितीत दिमाखदार पदग्रहण सोहळा
महाबळेश्वर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी सुनील शिंदे विराजमान ; खासदार नितीन काका पाटील यांच्या उपस्थितीत दिमाखदार पदग्रहण सोहळा
✍️मिलिंद काळे,
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी नवनिर्वाचित श्री. सुनील शिंदे यांनी आज मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात अधिकृत पदभार स्वीकारला. खासदार नितीन काका पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या पदग्रहण सोहळ्याने महाबळेश्वरच्या राजकीय वातावरणात नवचैतन्य निर्माण केले. नगरपरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारापासूनच फटाक्यांची आतिषबाजी, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नागरिकांची गर्दी यामुळे परिसर आनंदमय झाला होता.
खासदार नितीन काका पाटील, नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील शिंदे तसेच सर्व नगरसेवकांचे पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर सर्व लोकप्रतिनिधींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शिवरायांना वंदन केल्यानंतर नगराध्यक्ष शिंदे यांनी आपल्या दालनात प्रवेश करताना आई व पत्नी यांच्या हस्ते औक्षण करून फीत कापत कार्यालयात प्रवेश केला आणि त्यानंतर औपचारिकरित्या नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.
या पदग्रहण सोहळ्यानिमित्त आयोजित स्वागत समारंभाला राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. खासदार नितीन काका पाटील यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील शिंदे यांचे अभिनंदन करत महाबळेश्वरच्या विकासासाठी सर्वांनी पक्षभेद विसरून एकत्र काम करण्याचे आवाहन केले. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजू शेठ राजपुरे, संजय गायकवाड,महाबळेश्वर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश पाटील, श्रीनिवास शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, अपक्ष नगरसेविका स्मिता पाटील, भाजपचे नगरसेवक रवींद्र कुंभारदरे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, महिला, युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्यादरम्यान एक महत्त्वाचे राजकीय निरीक्षणही चर्चेत आले. या कार्यक्रमाकडे शिवसेना तसेच काही अपक्ष उमेदवार व सदस्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. मात्र, या बाबीचा एकूण सोहळ्याच्या उत्साहावर कोणताही परिणाम झाला नाही. नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्याकडून शहराचा नियोजित विकास, पर्यटनवाढ, मूलभूत सुविधा, स्वच्छता तसेच नागरी समस्या सोडवण्यासाठी ठोस व प्रभावी निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
पदग्रहणानंतर बोलताना नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी महाबळेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. नागरिकांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी नगरपरिषद, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात योग्य समन्वय साधून काम केले जाईल, असे त्यांनी सांगितले. एकूणच हा पदग्रहण सोहळा महाबळेश्वरच्या राजकीय व सामाजिक जीवनातील एक महत्त्वाचा आणि लक्षवेधी क्षण ठरला.
Comments
Post a Comment