महाबळेश्वर पालिका निवडणूक शांततेत पार; ८३.२६ टक्के मतदान, ईव्हीएम बिघाडामुळे दिवसभर धावपळ, उद्या मतमोजणी

महाबळेश्वर पालिका निवडणूक शांततेत पार; ८३.२६ टक्के मतदान, ईव्हीएम बिघाडामुळे दिवसभर धावपळ, उद्या मतमोजणी

✍️विलास काळे,

महाबळेश्वर प्रतिनिधी दि. २० — 

लोकशाहीचा उत्सव असलेल्या महाबळेश्वर गिरीस्थान नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज किरकोळ प्रकार वगळता एकूणच शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. नगराध्यक्ष पदासाठी पाच तर नगरसेवक पदासाठी ६१ अशा एकूण ६६ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज मतपेटीत सिलबंद झाले.

शहरातील एकूण १२ हजार ७०४ मतदारांपैकी १० हजार ५७७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून तब्बल ८३.२६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सचिन म्हस्के आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी संपूर्ण मतदान प्रक्रियेवर देखरेख ठेवली.

सकाळी साडेसात वाजता मतदानास प्रारंभ झाला. सुरुवातीला मतदानाचा वेग संथ होता. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत १७ मतदान केंद्रांवर केवळ १५ टक्के मतदान झाले होते. दुपारी दीड वाजेपर्यंत मतदानाचा टक्का २९ वर पोहोचला. दुपारनंतर सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी वाढली आणि पाहता पाहता रांगा लागल्या. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ४७.४० टक्के मतदान झाले होते. त्यानंतर संध्याकाळपर्यंत मतदानाचा वेग कायम राहिला.

दरम्यान, शहरातील १७ मतदान केंद्रांवर मतदान सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच काही ठिकाणी ईव्हीएम मशिन्स बिघडण्याच्या घटना घडल्या. दिवसभर अनेक मतदान केंद्रांवर हा प्रकार सुरूच राहिला. या तांत्रिक बिघाडामुळे प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. काही केंद्रांवर मशिन्स बदलण्यासाठी तब्बल एक तास वेळ लागत असल्याने मतदानासाठी आलेले काही मतदार मतदान न करताच माघारी फिरल्याचे चित्र दिसून आले. या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी प्रशासकीय अधिकारी आणि उमेदवारांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. दिवसभरात विविध प्रभागांमध्ये एकूण १४ ईव्हीएम मशिन्स बदलण्यात आल्या. त्यामुळे काही प्रभागांमध्ये रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते.

प्रभाग क्रमांक ९ मधील गवळी आळी येथील मतदान केंद्रावर दुपारच्या सुमारास उमेदवार व त्यांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. काही वेळातच दोन्ही बाजूंची गर्दी वाढल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून गर्दी पांगवल्याने पुढील अनर्थ टळला.

या निवडणुकीत मतदारांमध्येही उत्साह दिसून आला. प्रभाग क्रमांक ३ मधील बनाबाई शंकर उंबरकर या १०३ वर्षांच्या वृद्ध महिलेने मतदान करून लोकशाहीवरील आपला विश्वास व्यक्त केला.

महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर नगरपालिकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी महायुतीतील सर्वच पक्षांनी विशेष प्रयत्न केल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील अनेक मंत्र्यांचा या निवडणुकीत सक्रिय सहभाग राहिला. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी गेल्या चार दिवसांपासून महाबळेश्वरमध्ये मुक्काम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. आज त्यांच्या समर्थकांनी शहरातील विविध मतदान केंद्रांवर फेरफटका मारून पाहणी केली. सायंकाळी मंत्री मकरंद पाटील यांनीही काही प्रभागांतील मतदान केंद्रांना भेट देऊन मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला.

आज सकाळी प्रभाग क्रमांक ३ मधील मतदान केंद्रावर लोकमित्र जनसेवा आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तथा माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माजी नगरसेवक सुनील शिंदे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यासह माजी नगराध्यक्षा विमलताई पार्टे, अफजल सुतार, संगिता वाडकर, नासिर मुलाणी, राजेश कुंभारदरे, युसूफ शेख, रविंद्र कुंभारदरे, अ‍ॅड. संजय जंगम, अपर्णा सलागरे, रोहित ढेबे, विशाल तोष्णीवाल, पूजा उतेकर, राहुल पिसाळ यांच्यासह अनेक दिग्गज उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले आहे.

दरम्यान, उद्या महाबळेश्वर पालिका कार्यालयाशेजारील गिरीस्थान प्रशालेच्या मैदानावर मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून, शहराच्या पुढील नेतृत्वाचा फैसला कोणाच्या बाजूने जाणार याकडे संपूर्ण महाबळेश्वरचे लक्ष लागून राहिले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl